Dharamraobaba Atram on Local Body Election : महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील जनतेचंही या निवडणुकांकडे लक्ष आहे. जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तत्पूर्वी वेगवेगळे पक्ष, त्या पक्षांचे नेते मोर्चेबांधणी करू लागले आहेत. शक्य तितक्या जास्त निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा संकल्प महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे. मात्र, अनेक महापालिका, नगरपंचायतींमध्ये महायुतीतल्या पक्षांमधील व त्यांच्या नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. गडचिरोलीमधील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपा व महायुतीमधील मित्रपक्षांविरोधात दंड थोपटले आहेत. आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
रविवारी (१२ ऑक्टोबर) चामोर्शी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसवांद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. गडचिरोलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला व मित्रपक्षांना एकही जागा सोडणार नसल्याचं आत्राम यांनी म्हटलं आहे. त्यांनी प्रामुख्याने भाजपावर जोरदार टीका केली.
निवडणुकीत फक्त घड्याळ चालणार : धर्मरावबाबा आत्राम
“भाजपाने विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी डमी उमेदवार उभा केला, त्यांनी माझ्या पुतण्याला पाच कोटी रुपये देऊन निवडणूक लढवायला सांगितलं” असा दावा आत्राम यांनी केला आहे. मात्र, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही भाजपाला एक तकुडाही देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या निवडणुकीत गडचिरोलीत केवळ घड्याळ (राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह) चालेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“विधानसभेला माझ्याच पुतण्याला पाच कोटी देऊन डमी उमेदवार म्हणून उभं केलं”
माजी मंत्री धर्मरावबाबात आत्राम म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत तुम्ही माझ्याविरोधात माझ्याच पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभं केलं. भाजपाने मला पाडायला पाच कोटी रुपये दिले. आता (स्थानिक निवडणुकीत) तुम्ही म्हणता हिस्सा द्या. मी पुन्हा एकदा सांगतो एकही तुकडा देणार नाही. १९ जागांवर फक्त राष्ट्रवादीचाच (अजित पवार) गडी चालेल. घडी (घड्याळ) कुठेही थांबणार नाही.”