Dada Bhuse : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून धूसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. पण येत्या काही दिवसांमध्ये हा वाद सुटेल असं महायुतीच्या नेत्यांकडून अनेकदा सांगण्यात आलं. दरम्यान, यातच आता देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यावेळी अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा झाल्याची चर्चा आहे. या चर्चेत नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत काही चर्चा झाली का? असा सवाल मंत्री दादा भुसे यांना विचारण्यात आला. यावेळी दादा भुसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल असं मिश्किल वक्तव्य दादा भुसे यांनी केलं आहे.

दादा भुसे काय म्हणाले?

बंद दाराआड झालेल्या चर्चेत नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या विषयाबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्री दादा भुसे यांना विचारला. यावर उत्तर देताना दादा भुसे यांनी म्हटलं की, “नाही, तो विषय (नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय) आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल”, अशी मिश्किल प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

किशोरी पेडणेकरांची भुसेंवर टीका

दादा भुसे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,”डोनाल्ड ट्रम्प आधी तुम्हाला दारात उभा करतात का ते बघा. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या देशाशी ज्या पद्धतीने वागत आहेत, आपल्या पंतप्रधान मोदींशी ते ज्या पद्धतीने वागत आहेत, आपल्या देशावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत ते पाहता तुम्हाला (भुसे) डोनाल्ड ट्रम्प हे जवळ तरी उभा करतात का ते पाहा”, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे.