राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बडे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अंधारात लाईट सुरु करायला जात होते, त्यावेळी त्यांचा पाय घसरला, ते पडले आणि त्यांना दुखापत झाली. दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः एक्स पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे.

काय आहे दिलीप वळसे पाटील यांची पोस्ट?

काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन. अशी पोस्ट दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर १२ ते १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरु राहतील, असा अंदाज दिलीप वळसे पाटील यांनीच वर्तवला आहे. दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र ते लवकर बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे.
दिलीप वळसे पाटील हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री देखील होते. तसेच त्यांची पुणे जिल्ह्यात चांगली ताकद आहेत. ते आंबेगावात तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षात काहीसं चिंतेचं वातावरण आहे.