छत्रपती संभाजीनगर – तलवारीने केक कापून व रात्रीच्या वेळी डिजे लावून, नाच गाण्याच्या तालावर थिरकत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उमरी गावात घडला.
दिंद्रुड पोलिसांनी हा प्रकार समाजात दहशत माजवण्याचा असल्याचे निरीक्षण नोंदवत १८ जुलै रोजी कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केक कापण्यासाठी वापरलेल्या तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल जनार्धन शिंदे (वय ३४), महादेव प्रताप शिंदे (वय २२, रा. उमरी) विशाल गवळी (रा. पिंपळगाव (नाखला), दादा म्हस्के, (रा. पात्रुड) व सुनील जनार्दन शिंदे, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
माजलगाव तालुक्यातील उमरी येथील अनिल जनार्धन शिंदे याचा १५ जुलै रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त उमरी गावात मित्रमंडळीसह रात्रीच्या वेळी डीजेवर नाचण्यासह तलवारीने केक कापण्यात आला. वाढदिवस कार्यक्रमास अनिल शिंदे याचे काही मित्र उपस्थित होते. आपले गावातील व परिसरातील वजन दाखविण्यासाठी वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्यात आला, अशी प्राथमिक माहिती समोर आली. कार्यक्रमाची छायाचित्रे काढण्यात आली. ही छायाचित्रे अनिलचा भाऊ सुनील शिंदे याने त्याच्या समाजमाध्यमावर प्रसारित केली. हा प्रकार कळल्यानंतर दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेतली.
वाढदिवस हा दिंद्रुड ठाणे हद्दीतील उमरी गावात रात्री साडे आठनंतर साजरा करण्यात आल्याचा तपशील हाती लागला. तसेच छायाचित्रात तीन तलवारीव्दारे केक कापणाऱ्या चार व्यक्ती या अनिल शिंदे, महादेव शिंदे, विशाल गवळी, दादा म्हस्के असल्याचे स्पष्ट झाले. तलवारीने केक कापल्याबाबतची छायाचित्रे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अनिल शिंदेचा भाऊ सुनील शिंदे याने त्याच्या समाज माध्यमावरून पसरवल्याचे समोर आल्यानंतर वरील पाचही आरोपींवर शस्त्र अधिनियम अन्वये दिंद्रुड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील संजयकुमार राठोड, नंदकुमार वाघमारे, युवराज श्रीडोळे, कैलास पोटे यांनी केली. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्याचे प्रकारही वाढले होते. तलवारीने केक कापण्याचा प्रकार कमी व्हावा म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.