सांगली : सांगली जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक सक्षमपणे चालावी यासाठी प्रशासकीय कामकाजात संचालकांनी हस्तक्षेप टाळावा असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विस्तारीकरण इमारतीचे भूमीपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कामासाठी आठ कोटींचा खर्च येणार आहे. यावेळी बँकेेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व संचालक उपस्थित होते. तत्पुर्वी संचालक बाळासाहेब होनमोरे व अस्मित होनमोरे यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, येत्या दोन तीन वर्षात संपूर्ण जिल्ह्यात सिंचन योजनेचे पाणी पोहचणार आहे. कोणतेही सरकार असले तरी या कामात आता अडचणी येणार नाहीत. टेंभू योजनेसाठी आठ तर जतसाठी म्हैसाळ सुधारित योजनेसाठी सहा टीएमसी पाणी आरक्षित केले आहे. सिंचन सुविधा झाल्यानंतर केवळ उसलागवड करून चालणार नाही. यापुढील काळात पिक नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी बँकेने पुढाकार घेउन तज्ञांकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. एखादे चर्चासत्र संचालक अजितराव घोरपडे यांना घेउन आयोजित करावे.




जिल्हा बँक सक्षम व्हावी यासाठी संचालकांनी कर्जवाटप व कर्ज वसुली यामध्ये हस्तक्षेप टाळला पाहिजे. साखर कारखाना व शेतीपूरक उद्योगांना कर्जपुरवठा करत असताना त्याची वसुलीही झाली पाहिजे. यामध्ये संचालकांनी हस्तक्षेप टाळायला हवा. या वर्षी उस टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने कारखाने ७० ते ८० दिवसच चालतील अशी स्थिती आहे. यामुळे कारखाने अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्जदार अडचणीत आला तर त्याचे परिणाम बँकेवरही होउ शकतात. यासाठी व्यापक बैठक घ्यावी असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.