हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमा दरम्यान उष्माघातामुळे दगावलेल्या मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र त्या अगोदर खोपोली जवळ बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना शासकीय मदत अद्यापही मिळू शकलेली नाही. त्यामुळे मदत वाटपात शासनाकडून भेदभाव होतोय की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

१५ एप्रिल २०२२ ला खोपोली जवळ एक खाजगी बस बोरघाटात दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २९ जण जखमी झाले होते. मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभु झांज पथक एका कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड येथे गेले होते. तिथून परतत असतांना ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली होती. तर केंद्र सरकारच्या वतीनेही या दुर्घटनेतील मृतांच्या वारासांना मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र यासाठी शासनाकडून अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे मृतांच्या वारसांना शासकीय मदतीचे वाटप होऊ शकलेले नाही.

आणखी वाचा- खारघरहून परतलेल्याला मुरबाडच्या श्रीसेवकाचा मृत्यू; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांकडून दावा

पण दुसरीकडे १६ एप्रिल २०२२ रोजी खारघर येथे महाराष्ट्र भुषण कार्यक्रमा दरम्यान उष्माघाताने दगावलेल्या १४ जणांच्या वारसांना शासनाकडून मदतीचे तातडीने वितरण करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर चारच दिवसात मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. राज्य शासनाने जी तत्परता उष्माघात दुर्घटनेतील मृतांच्या वरसांना मदत वाटपात दाखवली आहे. तशीच तत्परता शासनाने खोपोली बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना देतांना का दाखवली नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच त्याचे तातडीने वितरण करण्यात येईल अशी माहीती आपत्ती व्यवस्थापन विभागा मार्फत देण्यात आले आहे.