Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप आता केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी काय म्हटलं?

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी रिपब्लिक या वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. दिशा सालियनची आत्महत्या होती की हत्या? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर सतीश सालियन यांनी म्हटलं की, “एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही. डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. १४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असा सवाल सतीश सालियन यांनी उपस्थित केला.

तुमच्यावर कोणाचा दबाव होता का?

२०२२ मध्ये तुमच्यावर कोणाचा दबाव होता का? या प्रश्नावर बोलताना सतीश सालियन यांनी म्हटलं की, “माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता. मात्र, मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं. तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हा वाटला होता. तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे. तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता”, असं सतीश सालियन म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वकील निलेश ओझा काय म्हणाले?

वकील निलेश ओझा यांनी देखील दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. निलेश ओझा यांनी म्हटलं की, “घटना घडल्याच्या पहिल्या दिवसांपासून दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा हाच सवाल होता की १४ व्या मजल्यावरून पडल्यानंतर रक्ताचा एक थेंब देखील दिसला नाही. तसेच कपड्यावर देखील एकही रक्ताचा थेंब आढळला नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे दिशा सालियनचा मृतदेह जेव्हा कुटुबीयांकडे सोपवण्यात आला होता, तेव्हा बॉडीवर एकही जखम नव्हती. मग इमारतीच्या मजल्यावरून पडल्यानंतर एकही जखम कशी झाली नाही? हा प्रश्न आहे?”, असं वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.