पंढरपूर : राज्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्याने यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा कोणी करायची या पेचप्रसंगावर आज पडदा पडला आहे. यंदाची महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा पेचप्रसंग तयार झाला होता यावर राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागवला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे व मानाचे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. यंदाची कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे.

येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला केली जाते. शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याच्या हस्ते केलेली ही शासकीय महापूजा म्हणून प्रचलित झाली. पहिली शासकीय महापूजा मुख्यमंत्री या नात्याने कन्नमवार यांच्या हस्ते २ जुलै १९६३ रोजी झाली. पुढे शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते एकदा, तर शरद पवार यांनी ४ वेळा विठ्ठलाची महापूजा केली.

मनोहर जोशी यांनी सलग ३ वेळा, तर अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रत्येकी एकदा महापूजा झाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ४ वेळा, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ वेळा महापूजा झाली आहे. तर, विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वाधिक ६ वेळा विठ्ठलाची महापूजा झाली आहे.

आषाढी आणि कार्तिकी या दोन मुख्य वारीवेळी ही शासकीय महापूजा होते. १९९५ पूर्वी या दोन्हीही महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत होत्या. या शासकीय महापूजेत १९९५ साली बदल करण्यात आला. युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आषाढीची पूजा तर उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी कार्तिकीची पूजा करावयाची असे ठरले. ही परंपरा पुढे कायम ठेवण्यात आली.

मात्र, गेल्या वर्षीपासून राज्यास दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी आचारसंहितेमुळे ही महापूजा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते झाली होती. यानंतर यंदाच्या महापूजेवेळी हा पेच पुन्हा पुढे आला.

यंदाचा मान एकनाथ शिंदे की अजित पवार या दोघांपैकी कोणाला मिळणार हा पेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पुढे आला होता. त्यावर समितीच्या बैठकीत कोणाच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा निर्णय घेऊन पत्र पाठवले. त्यावर आज शासनाने यंदाची महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र पाठवल्याची माहिती शेळके यांनी दिली आहे.