संपर्कप्रमुखांना धक्काबुक्की; पोलिसांकडे तक्रार

नगर : महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लगेचच या पदावरून शिवसेनेत असलेल्या असंतोषाचा भडका काल, मंगळवारी रात्री उडाला आणि नगरसेवकांमध्ये मारहाणीचे प्रकार घडले. शहरातील सक्कर चौकाजवळ असलेल्या, नवीन टिळक रस्त्यावरील एका हॉटेलच्या आवारात नगरसेवकांच्या समर्थकांतही मारामाऱ्या झाल्या. हॉटेलमधील काचाही फोडण्यात आल्या. संपर्कप्रमुखांना धक्काबुक्की झाली. मात्र शहर शिवसेनेकडून यावर मौन बाळगले जात आहे. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी धक्काबुक्की झाल्याचा इन्कार केला.

या संदर्भात नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौरांचे पती व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्याविरोधात, महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका रिता भाकरे यांचे पती शैलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा तक्रार अर्ज कोतवाली पोलिसांकडे देण्यात आला आहे. शैलेश भाकरे यांचे बंधू नीलेश भाकरे यांनी हा तक्रार अर्ज दिला आहे. मारहाणीच्या वेळी गावठी कट्टा, तलवार, लाकडी दांडके याचा वापर करण्यात आला, असेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. मात्र आज, बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी तक्रार अर्ज प्राप्त झाल्याचे सांगितले.

या संदर्भात शैलेश भाकरे यांची, आपल्याला अनिल शिंदे व संभाजी कदम यांनी मारहाण केल्याची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात होती. मिळालेली माहिती अशी, बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेच्या वतीने नवीन टिळक रस्त्यावरील एका नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये रात्री भोजन आयोजित करण्यात आले होते. भोजनानंतर शैलेश भाकरे यांची अनिल शिंदे व संभाजी कदम यांच्याशी प्रथम वादावादी रंगली, नंतर यांच्यामध्ये मारामारी झाली. दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकावर तुटून पडले होते. हॉटेलमधील काचाही फोडण्यात आल्या.

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपर्कप्रमुखांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या राडय़ाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्व लवाजमा कोतवालीच्या आवारात जमला होता. तेथेही दोन्ही बाजूंकडून परस्परांचा उध्दार केला जात होता.

असंतोषाचा भडका आणखी उडणार

महापालिकेतील सत्तेसाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्यावरून व महापौर पदाच्या उमेदवारीवरूनही शहर शिवसेनेत मोठे वाद आहेत. ही खदखद काल, मंगळवारी कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासमोरही व्यक्त झाली होती. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या भूमिकेवरूनही वाद आहेत. महापौरपदासाठी मोहीम राबवताना राठोड समर्थकांना डावलले असाही आक्षेप आहे. या सर्वाचे पडसाद काल रात्री झालेल्या राडय़ामध्ये उमटले. भविष्यातही या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.