कराड : लोकसेवकाच्या पदाचा दुरुपयोग करत आर्थिक फायद्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या कराड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन फौजदार भरत गोपाळ होळकर (वय ६६) यांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. पतंगे यांनी दोषी ठरवून तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
फिर्यादी गुलाब रामचंद्र गुजर (४०, रा. केर, ता. पाटण, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भरत गोपाळ होळकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल अर्जाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच मागितली होती. आणि ही सात हजार रुपयांची लाच त्यांनी दिनांक २० जुलै २०१४ रोजी दुपारी कराड शहरातील पंचायत समिती व कराड तहसीलदार कचेरी परिसरातील दर्शन रेस्टॉरंटसमोरील मोकळ्या जागेत पंचासमक्ष स्वीकारली होती. त्यावरून कराड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन फौजदार भरत गोपाळ होळकर (वय ६६) यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कराड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन फौजदार भरत गोपाळ होळकर (वय ६६) यांनी पोलीस ठाण्यात दाखल अर्जाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याच्या मोबदल्यात घेतलेल्या या लाच प्रकरणाचा सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांनी कसून केला होता. त्यानंतर विशेष प्रकरण नं. १५/२०१४ अंतर्गत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील एम. व्ही. कुलकर्णी व आर. डी. परमाज यांनी युक्तिवाद करत एकूण चार साक्षीदार तपासले.
प्रत्यक्षदर्शी साक्षी, पंच, तपासी व अंमलदार यांच्या साक्षींवर विश्वास ठेवत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. पतंगे यांनी आरोपी भरत गोपाळ होळकर यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच कलम १३(१)(ड), १३(२) अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस नाईक रमेश वीरकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची भूमिका बजावली.