नातेपुते : टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर केले. या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांनी पालखीचे दर्शन घेऊन पायी चालून वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगावर ठेकासुद्धा धरला. माउलींचा पालखी सोहळा नातेपुते येथे मुक्कामी असून मंगळवारी पुरंदवडे येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे.
आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माउलींच्या पालखी तसेच सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माउलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी, भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. यानंतर पालखी पुढे नातेपुते येथे मुक्कमी पोहोचली. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे आगमन सकाळी १०.४५ वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, फलटणचे उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माउलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान, मंगळवारी म्हणजे आज नातेपुते येथून मंगळवारी माउलींची पालखी पुढे मार्गक्रमण करून मांडवी ओढा येथे विसावा घेईल. त्यानंतर पुरंदवडे येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे.
पालखी स्वागतानंतर पालकमंत्री गोरे व प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर चालत गेले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष केला. तसेच पालकमंत्री महोदय व माजी आमदार राम सातपुते यांनीही फुगडी खेळली.
संत तुकाराम महाराज पालखी प्रवेशमंगळवारी एकीकडे माउलींचे पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे, तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे प्रवेश करणार आहे. अकलूज येथे तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होणार आहे.