सातारा : नीरा स्नान करत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात पालखी सोबत हजारो वारकऱ्यांनी जिल्ह्यात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यात पाडेगाव (ता. खंडाळा) येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत केले. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनीही पालखीस पुष्पहार अर्पण करत स्वागत केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी गुरुवारी सकाळी सातारा जिल्ह्याकडे रवाना झाली. या वेळी जिल्ह्याची हद्द ओलांडताना नीरा नदीत पादुकांना स्नान पार पडले. स्नान घातल्यानंतर पुन्हा रथात ठेवण्यात आल्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. जिल्ह्यातील पाडेगाव येथे आगमन झाल्यावर मान्यवरांनी स्वागत केले. तसेच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.