सावंतवाडी: दोडामार्ग ते बांदा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दूरदृष्टी न ठेवता विद्युत लाईन, गॅस वाहिनी आणि जलवाहिनींना परवानगी दिल्याने भविष्यात होणाऱ्या रुंदीकरणासाठी मोठा अडथळा निर्माण केला आहे. गोवा, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आडाळी औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या या मुख्य मार्गावर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे लोकांचा जीव धोक्यात आला असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धोकादायक परवानग्यांमुळे भविष्यातील विकास रखडणार
दोडामार्ग ते बांदा हा मार्ग मुंबई-गोवा राज्य महामार्ग तसेच नियोजित आडाळी एमआयडीसी व आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा असल्याने भविष्यात या मार्गाचे चौपदरीकरण करणे अपरिहार्य आहे. याची कल्पना असूनही, बांधकाम विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी चक्क रस्त्याच्या साईड पट्टी खोदून गॅस वाहिनी, जलवाहिनी, तसेच ३३ केव्ही आणि ११ केव्ही वीज वाहिन्या टाकण्यास परवानगी दिली आहे.
गॅस वाहिनी: यापूर्वी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला परवानगी देण्यात आली, ज्याची पाईपलाईन रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही पाईपलाईन आज मृत्यूचा सापळा बवण्याची भिती आहे. तशा घटनांची नोंद घेतली जात आहे.
जलवाहिनी: काही वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण विभागाने सासोली ते डेगवे बांदा दरम्यान तिलारी नदीचे पाणी वेंगुर्ला, मालवण येथे नेण्यासाठी मोठी जलवाहिनी टाकताना रस्ता आणि साईडपट्टीचे मोठे नुकसान केले आहे. हि पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था रस्त्याच्या कडेला किंवा गटारात आहे. त्यामुळे ती भिती टांगती तलवार कायम राहिली आहे.
विद्युत वाहिनी: सध्या याच रस्त्याच्या डांबरीकरणापासून केवळ अर्धा ते एक मीटर अंतरावर ३३ केव्ही व ११ केव्ही वीज वाहिनींसाठी मोठ्या आकाराचे पोल (खांब) उभारण्याचे काम सुरू आहे. सुरक्षित अंतर न पाळता बसवलेले हे पोल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
या धोकादायक आणि नियमबाह्य परवानग्यांमुळे जनतेचा जीव तर धोक्यात आलाच आहे, शिवाय भविष्यात रस्ता रुंदीकरणाच्या वेळी हे सर्व पोल आणि वाहिन्या मोठे अडथळे ठरणार आहेत.
बांधकाम विभागाच्या दुटप्पी कारभारावर टीका
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारावर नागरिक जोरदार टीका करत आहेत. सामान्य नागरिकांनी रस्ता खोदून पाईपलाईन टाकल्यास दंड आकारणारे हेच अधिकारी, जेव्हा नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो, अशा वीज वाहिन्या किंवा गॅस पाईपलाईनसाठी चक्क रस्ता आणि साईड पट्टी खोदून काम करायला परवानगी देतात, हा कुठला निर्णय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा महत्त्वाचा राज्यमार्ग असूनही, रस्त्यांची काळजी घेणारे बांधकाम खाते डोळे बंद करून कारभार करत आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी डेप्युटी इंजिनियर आणि शाखा अभियंते यांचे लक्ष या धोकादायक कामांकडे वेधूनही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. दोडामार्गवासियांनी बांधकाम विभागाच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, तातडीने या कामांची चौकशी करून नियमबाह्य परवानग्या रद्द करण्याची आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.