वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील थेट सामन्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर समोर आल्या आहेत. जंगलांची होणारी कत्तल आणि घटत जाणारं प्रमाण यासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. याच कारणामुळे बिबटे मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात घडली आहे. एक बिबट्या एका घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना चक्क एका कुत्र्यानं त्याला पळवून लावल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे CCTV फूटेजमध्ये?

राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात हा प्रकार घडला असून तो घराच्या बाहेर असणाऱ्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची तारीख सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत नसली, तरी वेळ साधारण मध्यरात्र उलटून गेल्यानंतर १ किंवा २ वाजेदरम्यानची असल्याचं दिसत आहे. रात्री शांतता झाल्यानंतर दबा धरून बसलेला बिबट्या या घराच्या अंगणात शिरला. त्यानं बाहेर व्हरांड्यात झोपलेल्या कुत्र्याच्या दिशेनं मोर्चा वळवला. दबक्या पावलाने व्हरांड्याच्या पायऱ्या चढून या बिबट्यानं थेट समोर झोपलेल्या कुत्र्यावर झेप घेतली.

अचानक बसलेल्या या धक्क्यातून कुत्र्यानं स्वत:ला सावरलं आणि जीवाच्या आकांताने भुंकायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर हा कुत्रा जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्यावर चालून गेल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. कुत्र्याचा आक्रमक पवित्रा पाहून बिबट्याही काही क्षण अवाक् झाला. त्यानं लागलीच माघार घेत काही क्षण परिस्थितीचा अंदाज घेतला. समोर कुत्र्याचं सातत्याने भुंकणं चालूच होतं. कुत्रा आपल्याला वरचढ ठरत असल्याचा अंदाज बांधून बिबट्यानं चक्क तिथून काढता पाय घेतला आणि पुन्हा जंगलात पळ काढला.

पुण्यातही घडली होती अशीच घटना!

गेल्या महिन्यात पुण्याच्या मंचरत भागात एका बिबट्यानं चक्क सहा फूट उंच भिंतीवरून उडी मारून आतल्या कुत्र्याला उचलून नेल्याचं समोर आलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेजही व्हायरल झालं होतं. या घरातील कुटुंबीयांचा कुत्रा काही दिवस बेपत्ता झाल्यामुळे ते चिंतेत होते. नंतर त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. यात एका बिबट्यानं भर वस्तीत रात्रीच्या सुमारास झोपलेल्या एका कुत्र्याला उचलून नेलं होतं. यावेळी बाजूलाच खाटेवर झोपलेली व्यक्ती कुत्र्याच्या आवाजाने घाबरून जागी झाली होती.