सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात नियमभंग केलेल्या ‘आवाजाच्या भिंती’ आणि तीव्र प्रकाशझोत चालकांवर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अनेक मंडळांकडून ‘आवाजाच्या भिंती’ (डॉल्बी), तीव्र प्रकाशझोतचा (लेझर लाईट) वापर केला जातो. याबाबत शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या अंतर्गत काही व्यावसायिकांनी शिस्तीत काम करणे सुरू केले आहे. तरीही सातारकरांच्या डोळ्यांचा त्रास वाढू लागला आहे. यावर पोलिसांनी आवाजाच्या भिंती आणि तीव्र प्रकाशझोत यंत्रणेच्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
साताऱ्यात गणेशोत्सवाच्या आनंदाला उधान आले आहे. तीव्र प्रकाशझोत आणि आवाजाच्या भिंतींनी काही ठिकाणी मर्यादांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याविषयी प्रशासनाने गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये आवाजाच्या भिंतींचा व तीव्र प्रकाशझोतचा त्रास झाल्यास कोणालाही सुट्टी देणार नसत्याचा इशारा दिला आहे. साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आवाजाच्या भिंती आणि तीव्र प्रकाशझोत असणाऱ्या वाहनांवर बंदीची मागणी केली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी भर पावसात मोर्चाही काढला होता. त्याचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.
पोलीस कारवाई करत असताना दुसरीकडे नागरिक भर पावसात या यंत्रणेला विरोध करताना दिसत आहेत. त्यासाठी आंदोलन करत आहेत. जर कोणीही आवाजाचे आणि तीव्र प्रकाशझोतांच्या यंत्रणेने नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे. काही व्यावसायिकांनी शिस्तीत काम करणे सुरू केले आहे. तरीही सातारकरांच्या डोळ्यांचा त्रास वाढू लागला आहे. यावर पोलिसांनी आवाजाच्या भिंती आणि तीव्र प्रकाशझोत यंत्रणेच्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
मर्यादा ओलांडल्यास कारवाई – शंभूराज देसाई
आवाजाबाबत संपूर्ण जिल्ह्यात समान आदेश लागू आहेत. कोणत्याही मंडळाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा आवाजाच्या भिंतीचा आवाज जास्त झाल्यास ‘प्रशासन व पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. सातारा येथे पालकमंत्री कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूर येथे गणेश आगमन मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूककोंडीबाबत प्रशासनाने कारवाई केली आहे. मात्र, जिल्ह्यात इतरत्र अशी अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल माध्यमांकडून करण्यात आला. यावर शंभूराज देसाई म्हणाले, जिल्ह्यात सर्व ठिकाणी प्रशासन व पोलिसांना समान आदेश देण्यात आले आहेत.