Jitendra Awhad Receives Death Threats: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला विधिमंडळातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. हे घटनेनंतर आता विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या आवारातच आमदारांना मारण्यासाठी गुंड आणले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तत्पूर्वी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर दुपारी केलेल्या एका पोस्टमध्ये पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्याकडून धमकीचे संदेश आल्याचा दावा केला. या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी दिली, असेही आव्हाड यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले की, मी विधिमंडळात असताना धमकीचा संदेश आला असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात काय सुरू आहे? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री कार्यालय, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस यांनाही या पोस्टमध्ये टॅग केले.

जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टसह एक स्क्रिनशॉटही जोडला आहे. ज्यामध्ये कार्यकर्त्याने काय म्हटले याचा उल्लेख केला आहे. यात म्हटले की, ‘गोपी साहेबाच्या नादाला लागला तर तू मेला’, ‘तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती. पण साहेबांनी घातली नाही.’ तसेच या संदेशाबरोबर अश्लील शिवीगाळही करण्यात आली आहे.

Jitendra Awhad Threat
जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट

वादाची सुरुवात कशी झाली?

मागच्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात प्रवेश करत असताना “मंगळसूत्र चोराचा.., मंगळसूत्र चोराचा…” अशी घोषणाबाजी केली होती. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र त्यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. यानंतर १६ जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विधिमंडळाच्या गेटवर बाचाबाची झाली. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या गाडीचा दरवाजा जोरात उघडल्यामुळे तो आमदार जितेंद्र आव्हाड आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना लागल्याचा आरोप आव्हाड यांच्याकडून करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व घडामोडीनंतर आज गुरुवारी १७ जुलै रोजी दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते भिडले आणि त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीतच हाणामारी केली.