पंढरपूर : एखाद्याच्या वाढदिनी कोणी अभीष्टचिंतन करत असेल आणि त्याचा कोणी अन्य अर्थ काढत असेल, तर ते चुकीचे आहे. ही संकुचित वृत्ती आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. अशा पद्धतीने जे कोणी वागत असेल, ते कुठल्या संस्कृतीत जगत आहेत हे कळते, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येथे संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. ते करताना त्यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याने त्यावरून कालपासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, की माझ्या वाढदिनी एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यासाठी या दोन्ही मोठ्या नेत्यांना प्रतिक्रिया मागितली होती. ती देताना त्यांनी आपली भावना व्यक्त केली. मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण, याचा अन्य अर्थ काढणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
खरे तर आम्ही राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाही. वाढदिवशी प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. अशा वेळीही प्रत्येक शब्दाचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने जे कोणी वागत असेल, तर ते कुठल्या संस्कृतीत जगत आहेत हेही कळते, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
या वेळी फडणवीस यांना लगोलग अनेक राजकीय प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी उत्तर टाळले. मी संत नामदेव महाराज यांच्या संजीवन सोहळ्याच्या स्मृती कार्यक्रमासाठी आलो आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. अशा वेळीही राजकीय भाष्य कशासाठी, अशी विचारणा त्यांनी केली.