सातारा : आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी म्हणून असणाऱ्या ओळखीला छेद देणाऱ्या घटना घडू लागल्याने आजच्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे काय, असा सवाल प्रा. डॉ . भास्करराव कदम यांनी सातारा येथे उपस्थित केला.सातारा येथील शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या (सुटा) कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिटूचे नेते ॲड. कॉ. वसंत नलावडे होते. यावेळी कॉ. विजय मांडके उपस्थित होते.

डॉ. भास्करराव कदम म्हणाले, ज्या शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला आणि पुढील काळात अनेक समाजसुधारक आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींनी प्रबोधन चळवळ राबवून महाराष्ट्र मनाची मशागत केली, याच महाराष्ट्राची पुरोगामी राज्य म्हणून असणारी ओळख पुसली जाणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे.इतिहासाची जाण नसल्याने आजची तरुण पिढी ही बुद्धिभ्रंश झाल्यासारखी वागत आहे. त्यांनी इतिहासाचे नीट आकलन करून घेणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ. कदम यांनी नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील समाजप्रबोधन, स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय चळवळीतील त्यांच्या विविध विचार वाटेने झालेल्या प्रवासाचा धावता आढावा घेतला.

वसंत नलावडे म्हणाले, की नाना पाटील यांनी अवगत केलेली वक्तृत्व शैली विशेष म्हणावी लागेल. अवघड गोष्टी सोप्या भाषेत उघड करून सांगत त्यांनी केलेले प्रबोधन महत्त्वाचे ठरते. आता पुढील काळात नाना पाटील यांना स्मरून विद्रोहाद्वारे क्रांतीकडे जावे लागेल आणि तसा लढा तीव्रपणे उभा करावा लागेल.विजय मांडके यांनी स्वागत – प्रास्ताविक, प्रा राहुल गंगावणे यांनी सूत्रसंचालन, शुभम ढाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. विजय माने, सुनील गायकवाड, बाबुराव शिंदे, डॉ. पल्लवी साठे – पाटोळे, अमोल पाटोळे, दिलीप भोसले, नितनवरे तसेच विद्रोहीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.