नांदेड : ‘कोलंबसासारखाच मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे निखळ यशाच्या शिखरावर विराजमान होणार आहे. ‘आभाळमाया’ या बालकवितासंग्रहातील एका कवितेतून वरील आश्वासक आशावाद जागवणारे नांदेडचे ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी आता साहित्य अकादमी पुरस्काराचे शिखर गाठले आहे. त्यांच्या याच संग्रहाला बुधवारी पुरस्कार जाहीर झाला.

साहित्य अकादमीने २३ भारतीय भाषांतील यंदाच्या युवा आणि बालवाङ्मय पुरस्कारांची घोषणा केली. मराठी भाषा विभागात डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कवितासंग्रहाची निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर सावंत यांच्या नांदेडसह ठिकठिकाणच्या साहित्यिक, प्रकाशक स्नेहीजनांनी आनंद व्यक्त केला. डॉ. सावंत यांची पुस्तक लेखनाची कारकीर्द अर्धशतकाच्या टप्प्यावर असताना आभाळमाया हा कवितासंग्रह पुण्याच्या चेतक बुक्सतर्फे २०२३ साली प्रकाशित झाला होता. बहुरंगी आणि गुळगुळीत कागदावर छापण्यात आलेला हा कवितासंग्रह लक्षवेधी ठरला होता.

उच्च माध्यमिक शाळेच्या स्तरावर अध्यापन आणि नंतरच्या काळात मुख्याध्यापक या नात्याने प्रशासकीय जबाबदारी पार पाडतानाच डॉ. सावंत यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, समीक्षा, संशोधन आणि संपादन इत्यादी वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केेले; पण बालसाहित्य आणि बालशिक्षण, तसेच लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हे त्यांचे आस्थाविषय राहिले आहेत. त्यांची बालसाहित्यातील ३३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापूर्वी त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले होते. शिक्षक, मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. प्रौढांसाठी वेगवेगळ्या प्रकारांतील लेखन करतानाच सावंत यांनी बालवाचकांसाठी आपले लेखनसातत्य कायम राखले. विविध संस्थांच्या बालसाहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठीतील विख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना गतवर्षी जाहीर झालेला साहित्य अकादमी पुरस्कार अलीकडेच प्रदान करण्यात आला. त्यानंतर मराठवाड्यातील आणखी एका साहित्यिकास बालवाङ्मयासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने २०१० पासून बालवाङ्मयासाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू केले होेते. या प्रकारात पुरस्कार प्राप्त करणारे सावंत हे मराठवाड्यातील पहिलेच बालसाहित्यकार आहेत.