सोलापूर : सोलापूर-कोल्हापूर रस्त्यावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावाजवळ पुलावर निष्काळजीपणे थांबविलेल्या ट्रेलरवर पाठीमागून ट्रॕक्स वाहन आदळून घडलेल्या अपघातात दोघा तरूण भाऊ-बहिणीसह ट्रॕक्स चालकाचा मृत्यू झाला. तर दोन चिमुकली मुले जखमी झाली. दरम्यान, याप्रकरणी ट्रेलरचालकाविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रकांत श्रीमंत कुंभार (२२) आणि संगीता चौडप्पा कुंभार (वय ३२, रा. घत्तरगी, ता. अफझलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) या दोघा सख्ख्या भाऊ-बहिणीसह त्यांच्याच गावात राहणारा ट्रॕक्सचालक महिबूब दावल मणियार (वय २८) अशी या अपघातातील तिघा मृतांची नावे आहेत. मृत संगीता हिचा मुलगा शंकर (४) आणि मुलगी श्रावणी (वय ५) ही दोन्ही चिमुलकी मुले जखमी झाली असून त्यांच्यावर सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>>आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाने निवडणुका लढवाव्या; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मृत चंद्रकांत कुंभार हा कराड येथे शेतमजूर म्हणून काम करीत होता. तेथील काम संपल्यामुळे तेथील घरगुती साहित्य आपल्या गावी आणण्यासाठी बहिणीसोबत गेला होता. तेथून परत येताना पहाटे मंगळवेढ्याच्या अलिकडे आंधळगावाजवळ पुलावर थांबलेल्या ट्रेलरला पाठीमागून ट्रॕक्स गाडी जोरात आदळली. पवनचक्कीचे साहित्य घेऊन मंगळवेढ्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर पुलावर वाहतुकीला अडथळा होईल, अशा पध्दतीने थांबला होता. त्यास पुढे मागे रिफ्लेक्टरही लावले नव्हते. त्याभोवती कठडे किंवा दिशादर्शक आणि सूचनाफलकही उभारले नव्हते. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रेलरचालक इंद्रजितकुमार कृष्णासिंग (वय ३९, रा. मंजोली, ता. बाड, जि. पाटणा, बिहार) याच्याविरूध्द चौडाप्पा बसवराज कुंभार (रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.