दुष्काळात शेतकऱ्यांची होरपळ सुरू असताना सरकारने दुबार पेरणीसाठी दीड हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. सात-बारावर पेर नोंदविणे, पीककर्जासाठी पतक्षमतेची गरज यामुळे शेतकऱ्यांना तलाठय़ाची मिनतवारी करावी लागत आहे. त्यामुळेच तलाठय़ांची चंगळ सुरू असल्याचे चित्र तयार झाले आहे. केवळ १२० रुपयांची लाच घेताना स्वाती चंद्रकांत उजाडे ही तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकली. लाचेची रक्कम जेमतेम असली, तरी दिवसभरात तलाठय़ाकडे चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहता हा आकडा डोळे विस्फारणारा ठरू शकतो.
िहगोली तालुक्यातील आडगावचे शेतकरी सुरेश मुटकुळे यांना त्यांच्या व कुटुंबीयांच्या मालकीच्या आडगाव येथील शेतजमिनीचे पेरा प्रमाणपत्र तयार करून, त्यावर सह्या करून देण्यासाठी तलाठी उजाडे हिने १२० रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम घेताना तिला विभागाच्या पथकाने पकडले. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास िहगोलीतील रिसालाबाजार येथे उजाडे हिच्या राहत्या घराजवळ सापळा रचला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविली. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पाऊस रुसवा सोडत नसल्याने जिल्ह्यात ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक क्षेत्रातील पीक जळून गेले. राज्य सरकारने दुबार पेरणीसाठी हेक्टरी दीड हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. परंतु या साठीच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्याला तलाठय़ाच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. परंतु बिकट आíथक स्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांविषयी तलाठय़ांना कोणतीही सहानुभूती नाही. किंबहुना ते आपली कार्यपद्धती बदलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे. लाचेची रक्कम १२० रुपये असली, तरी तलाठय़ाकडे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किमान पाचशेच्या घरात असते. प्रत्येकी साधारण १०० रुपये रक्कम धरली, तरी तब्बल ५० हजारांची आपसूक वरकमाई यातून सहज होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought farmer in trouble corrupt talathi arrest
First published on: 31-07-2015 at 01:40 IST