राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या भारत जोडो यात्रेचे स्वागत केले असून, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यामध्ये सहभागही नोंदवला आहे. याशिवाय राज्यात या पदयात्रेस प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्वीटद्वारे राज्य सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा -“शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल तर…”; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा!

“राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून युवांमध्ये वाढणारा तीव्र असंतोष आणि #BharatJodo यात्रेला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळं धडकी भरल्याने मीडियाचं लक्ष हटवण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याची चर्चा आहे. पण लक्षात ठेवा…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही.!” असं रोहित पवार ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

यामध्ये रोहित पवार यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर सुरू असलेल्या कारवायांचा संदर्भही जोडला आहे. यामध्ये संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवायांचा समावेश होऊ शकतो.राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध केला जात असताना अटक करण्यात येत असेल तर हे चुकीचे आहे, असे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा – २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार – संजय राऊतांचा दावा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटातील एका आमदाराने गोळीबार केला. मात्र या आमदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जातोय, म्हणून एखादा चित्रपट थांबवल्यावर कारवाई केली जात आहे. ही आश्चर्याची बाब आहे. पोलीस यंत्रणेच्या मदतीने महाराष्ट्राचा आवाज दाबणार आहात का? माझा महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवला आहे?” असा सवालही रोहित पवार यांनी केला होता.