कराड : कराडमध्ये दर वर्षीप्रमाणेच यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असून, १० हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कराड नगरपालिका व ‘एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लब’तर्फे नगरपालिकेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात आयोजित बैठकीत हे आवाहन करण्यात आले. विविध विषयांवर चर्चा होऊन सूचना करण्यात आल्या. उपमुख्याधिकारी प्रफुल्ल वानखेडे, ‘एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लब’चे अध्यक्ष जालिंदर काशीद, नगरअभियंता सुधीर चव्हाण, अभियंता अमोल जाधव, आशिष रोकडे, संदीप रणदिवे, निवृत्त अभियंता अशोक पवार यांच्यासह विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची बैठकीला उपस्थिती होती.

उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवरील बंदी उठवल्यामुळे मोठ्या प्रमाणात या गणेश मूर्ती बाजारात आल्या. त्यांचे विसर्जन नदीत न करता ते कृत्रिम तळ्यातच होणे गरजेचे आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तळ्यात करण्याचा आदेश दिला आहे. नागरिकांना त्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच मोठ्या मूर्तींचे विसर्जन करताना घ्यावयाची खबरदारी, नगरपालिकेची तयारी, सामाजिक संस्थांचे सहकार्य, नागरिकांचे कर्तव्य या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा व सूचना करण्यात आल्या.

जालिंदर काशीद म्हणाले, की गतवर्षी सर्वांच्या प्रयत्नामुळे पाच हजार गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक करण्यात आले. यंदा अधिकाधिक नागरिकांना प्रोत्साहन देत १० हजार मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.

मगर, सापांपासून काळजी घ्यावी

सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्यात येणार आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे नदीपात्रात पाणी वाढले असून, नदीपात्रात मगर आणि सापांचाही वावर असल्याने नागरिकांनी नदीपात्रात काळजी घ्यावी. नागरिकांना सूचना देण्यासाठी नगरपालिकेसह सामाजिक संस्था नदीकाठावर असणार आहेत. मात्र, नागरिकांनी खोल पाण्यात जाऊ नये. तसेच नदीकाठावर प्रथमोपचार पेटी, रुग्णवाहिकेची सोय, कृत्रिम तळ्यांशेजारीच निर्माल्यकलशही असणार आहेत.