पंढरपूर : आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठल आणि रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होते. दर्शनरांगेतील वारकऱ्याला महापूजेचा मान मिळतो. मात्र, या वेळी जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही हा मान मिळावा, अशी मागणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे, असेही भुसे म्हणाले. भुसे यांच्या या नव्या मागणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे.

सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लाखो भाविकांना असते. वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रमुख चार यात्रांपैकी आषाढी आणि कार्तिकी यात्रेला विठ्ठलाची शासकीय महापूजा होते. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात झाली. पुढे १९९५ मध्ये युती सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आषाढी महापूजा मुख्यमंत्री, तर कार्तिकी महापूजा उपमुख्यमंत्री करतील, असा पायंडा पाडला. या महापूजेला विठ्ठलाच्या दर्शनरांगेतील पहिल्या वारकरी दाम्पत्याला मान मिळाला, तो आजतागायत सुरू आहे. यंदा मात्र येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीपुढे पेच निर्माण झाला होता. महापूजेसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला निमंत्रित करावे, अशी विचारणा समितीला विधी व न्याय विभागाकडे करावी लागली. त्यांच्या शिफारशीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले.

वास्तविक एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी अनेक मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असतात. आणि त्या सर्वांना देवाजवळ जाण्याची इच्छा असते. मंदिराचा गाभारा लहान आहे. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे कुटुंब, मानाचे वारकरी दाम्पत्य आणि सोबत मंत्री, अधिकारी असा लवाजमा असतो. यामध्ये कोणाला परवानगी द्यावयाची आणि कोणाला नाही याबाबत मंदिर समितीची अडचण होते. आता त्यामध्ये दादा भुसे यांनी झेडपीच्या विद्यार्थ्यांना मान द्यावा, अशी नवी मागणी केली. यातून पुन्हा मानापमान रंगणार आहे. तसेच यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळी ज्याप्रमाणे दर्शनरांगेतील भाविकाला सपत्नीक पूजेचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा. आपण मंदिर प्रशासनाला विनंती केली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करणार असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले.