दापोली– लोकशाहीने सर्वसामान्यांना बहाल केलेल्या न्याय, शासन, व प्रशासन या व्यवस्थांनी समन्वयाने काम केल्यास उत्तम काम उभे रहाते. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आज देश विकासाचे मार्गावर कार्यरत आहे. शेजारील राष्ट्रांशी तुलना करता स्थिरपणे विकसीत राष्ट्राकडे प्रगती करीत असल्याचे प्रतिपादन देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांनी केले.
मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन न्यायालयाचे परिरसातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण श्री. गवई यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमीत्ताने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुलचे मैदानात आयोजीत स्वागत व सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री योगेश कदम, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती चंद्रेशखर, न्यायमुर्ती, मंकरद कर्णीक, न्यायमुर्ती माधव जामदार, न्यायमुर्ती सुरेंद्र तावडे, जिल्ह्याचे प्रभारी न्यायाधीश विनोद जाधव, बार कौन्सील महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अँड. अमोल सावंत मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश अमृता जोशी अँड संग्राम देसाई, मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गवई म्हणाले, देशाचे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश या भूमीकेतून मी अनेक न्यायालयांची उद्घाटने केलेली असली तरी कोल्हापूर येथील खंड पिठाचे उद्घाटन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील न्यायालयाचे इमारतीचे दृष्टीने आज करण्यात आलेले उद्घाटन हे माझ्या कारकिर्दीतील अंत्यत महत्वाच्या घटना आहेत. तत्कालीन राष्ट्रपती रामनाख कोविंद यांच्यासमेवत बाबासाहेबांच्या मुळ गावास भेट दिली. त्यावेळी मंडणगड तालुक्याचे मुख्यालयी न्यायालय नाही हे बाब लक्षात आली. संविधानाचे निर्मीत्याचे मुळ गाव असलेल्या तालुक्यातच न्यायालय नाही ही बाब अस्वस्थ करणारी होती.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमुर्ती या भूमीकेने राज्यशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला व न्यायालयाच्या इमारतीचे भूमीपूजन व लोकापर्णा करण्याचे भाग्य अपेक्षा नसताना मला मिळाले, असे ही गवई यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यशासन या कामी सकारात्मक राहीले याचबरोबर बांधकाम विभागानेही दोन वर्षे व चार दिवस इतक्या कमी कालावधीत ठरवून दिलेल्या कालमर्यादेत अतिशय गुणवत्तापुर्ण काम केले आहे. न्यायीक पायाभूत सुविधांचे निर्मीतीचे बाबतीत राज्यशासन गेल्या दहा वर्षापासून अतिशय आग्रही राहीले असून राज्यात विविध ठिकाणी उत्तम सोईसुविधा निर्माण केल्या आहेत. या संदर्भात होणाऱ्या टिकेला शासनाने पुर्ण देशात कुठल्याही तालुक्यात नाही असे सर्व सोईसुविधांनी युक्त न्यायालय मंडणगड सारख्या दुर्गम भागात उभे करुन आपली कार्यकुशलता सिध्द करत कामातून उत्तर दिले आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायधीश या भूमीकेतून शासन व न्यायप्रणाली यात समन्वय साधत प्रक्रीयेतील विलंब दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यवस्थांचे अभावामुळे न्याय प्रक्रीयेस विलंब लागतो, त्यामुळे पक्षकांरावर अन्याय होतो. ही बाब लक्षात घेता न्याय प्रक्रीयेतील विलंबाची कारणे शोधून त्यावर उपाय शोधण्याचे काम केले आहे. सुविधा मिळाल्यानंतर न्याय प्रणालीची जबाबदारी आणखीन वाढली असून यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न जलद गतीने सुटतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
बाबासाहेबांच्या विचारांवर प्रेम करुन त्यानुसार काम करणारा त्यांचे विचारांचा एक सच्चा पाईक या नात्याने बाबासाहेबांच्या जीवन कार्याशी संबंधीत अनेक बाबी जोडण्याचे भाग्य व त्यांचे स्मृतींचे जतन करण्यासाठी झालेल्या प्रत्येक कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभलेले असल्याचे गवई यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुबंई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती सी. चंद्रशेखर, कोल्हापूर खंडपिठाचे मुख्य न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायाधीश माधव जामदार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अँड. उमेश सामंत यांनी तर मंडणगड वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. मिलिंद लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कोल्हापूर विभागातील बार कौन्सीलचे सर्व पदाधिकारी सदस्य व तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.