Eknath Khadse On Pranjal Khewalkar Rave Party : पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. या प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत कोकेन, गांजासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जातं.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आमदार एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. तसेच पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात माझा जावई दोषी असेल तर मी समर्थन करणार नाही. मात्र, अल्कहोलचा रिपोर्ट समोर आला असेल तर मग ड्रग्सचा रिपोर्ट आतापर्यंत समोर का आला नाही? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित करत काहीतरी काळंबेरं सुरू असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर आता मी संपूर्ण प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. कारण तपास सुरू आहे. त्यामध्ये आणखी काही बाबी समोर येत आहेत. मला असा प्रश्न पडतो की पोलीस यंत्रणेकडून अशा प्रकारचे व्हिडीओ प्रकाशित कसे केले जातात? पोलिसांकडून वारंवार माहिती कशी दिली जाते? एखाद्याच्या मोबाईलमधील फोटो बाहेर कसे जातात? मोबाईल पोलिसांकडे आहे, मग असं असताना हे फोटो पोलिसांकडून बाहेर जातात का? पोलीस कोणत्या कारणावरून असं करत आहेत? कोणाच्या सूचनेवरून पोलीस हे करत आहेत का?”, असे सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत.

“या प्रकरणात दोघांनी अल्कहोल घेतल्याची बातमी मी ट्विव्हीवर पाहिली. अल्कहोलचा रिपोर्ट समोर आला असेल तर मग ड्रग्सचा रिपोर्ट आतापर्यंत समोर का आला नाही? अल्कहोलचा रिपोर्ट तुमच्याकडे येतो आणि ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही? म्हणजे यात काही काळंबेरं तर नाही ना? कारण पोर्से प्रकरणात एक असं उदाहरण घडलं आहे. ब्लडच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याची घटना त्या प्रकरणात झाली, त्यातील दोन डॉक्टर अद्याप तुरुंगातच आहेत. त्यामुळे या प्रकरणातही अल्कहोलच्या रिपोर्टबरोबर ड्रग्सचाही रिपोर्ट यायला हवा होता. यात काय काळंबेरं आहे? या रिपोर्टमध्ये देखील तशा प्रकारचं फेरफार होऊ शकतं, असा मला संशय आहे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“पोलीस पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर जेवढी तत्परता दाखवत आहेत, तेवढी तत्परता लोढा प्रकरणामध्ये का दाखवत नाहीत? रेव्ह पार्टी प्रकरणाबाबत पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. मग लोढा प्रकरणाबाबत पोलीस पत्रकार परिषद का घेत नाहीत? त्या प्रकरणातील एफआयआर देखील आम्हाला मिळत नाही. त्या प्रकरणातील सीडीमध्ये आणि मोबाईलमध्ये काय आहे हे देखील आम्हाला सांगायला पाहिजे होतं?”, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

‘माझा जावई दोषी असेल तर…’: खडसे

“पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात माझा जावई दोषी असेल तर मी समर्थन करणार नाही. पण या प्रकरणाबाबत मला पोलीस अधिकाऱ्यांकडून खासगीत माहिती मिळते की घटनेच्या आधी सकाळपासून हे सर्व सुरू होतं. यासाठी पोलिसांची मीटिंग झाली. या प्रकरणात सत्य काय आहे? याबाबत मी देखील संपूर्ण पाठपुरावा करणार आहे. तसेच पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर मी या प्रकरणावर सविस्तर बोलेन. कारण या प्रकरणात मला संशय घ्यायला जागा आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेव्ह पार्टी प्रकरण काय आहे?

पुण्याजवळच्या खराडी भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. एका गृहनिर्माण संकुलात शनिवारी मध्यरात्री ही पार्टी चालू होती. स्वत: प्रांजल खेवलकरही या पार्टीमध्ये उपस्थित होते. पोलिसांना या रेव्ह पार्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. तिथे दारूसह गांजा व हुक्का मोठ्या प्रमाणावर आढळून आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून पाच पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेतलं. खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई असल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.