scorecardresearch

अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

अमित शाहांनी एकनाथ खडसेंची भेट नाकारली, त्यांना तीन तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करायला लावली, अशा विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…
संग्रहित फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाहांनी एकनाथ खडसेंना भेट नाकारली, त्यांना तीन तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करायला लावली किंवा एकनाथ खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत, अशा विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

या सर्व चर्चेदरम्यान, एकनाथ खडसे यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे. मी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटणारच आहे. मी कोणत्याही राजकीय कारणांसाठी त्यांना भेटत नाहीये. अन्य विषयासंदर्भात मला त्यांची भेट हवी आहे, असंही खडसे यावेळी म्हणाले. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “बारामतीचा शरद पवार नावाचा माणूस…” एकेरी उल्लेख करत गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!

राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले, “मी शरद पवार यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मी भेट घेणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय विषय नाही, अन्य एका विषयासंदर्भात मला दोघांशीही चर्चा करायची आहे. अमित शाहांना भेटायला जाताना शरद पवारच माझ्यासोबत असणार आहेत. त्यामुळे मी भाजपात जाणार आहे, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी ५० खोके घेऊन दुसऱ्या पक्षात जाणारा माणूस नाही.”

हेही वाचा- “जेव्हा खरी गोष्ट समोर येईल, तेव्हा…” एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, अमित शाहांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयाबाहेर तीन तास थांबलो, असं विधान गिरीश महाजनांनी केलं आहे. ही माहिती रक्षाताई खडसेंनी आपल्याला दिल्याचा दावा गिरीश महाजनांनी केला. मात्र, याबाबत मी रक्षाताईंशी चर्चा केली, पण त्यांनी अशी कुठलीही माहिती दिली नाही. त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की, आम्ही अमित शाहांची भेट घ्यायला गेलो होतो. पण आमची भेट झाली नाही. विशेष म्हणजे अमित शाहांची भेट घेण्याबाबतची पूर्वकल्पना मी शरद पवारांना आधीच दिली होती. गर्दीमुळे तुमची भेट झाली नसेल तर मी स्वत: तुमच्यासोबत येतो. आपण दोघे जाऊन अमित शाहांची भेट घेऊ, असं शरद पवारांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे याबाबत गैरसमज होण्याचा प्रश्नच नाही, असंही खडसे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या