Eknath Shinde on Devabhau Campaign: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या हजारो मराठा आंदोलकांना शांतपणे परत पाठविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाकडून कौतुक झाले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तीन जीआर काढण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण संपवले. तसेच ओबीसींचीही नाराजी ओढवली जाऊ नये, यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले. यानंतर आज राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून ‘देवाभाऊ’ हे कॅम्पेन राबविण्यात आले आहे. या कॅम्पेनवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवाभाऊ कॅम्पेन काय आहे?

मुंबईत आज ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करताना दिसत आहेत. तर फोटोखाली ‘देवाभाऊ’ एवढेच लिहिले आहे. ही जाहिरात कुणी लावली, याबद्दल बॅनरवर कोणताही उल्लेख केलेला नाही. तसेच पक्षाचेही नाव नाही. मात्र मराठा आरक्षणात तोडगा काढल्याबद्दल हे कॅम्पेन राबविले गेले असल्याचा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात माध्यमांशी विसर्जनानिमित्त संवाद साधत असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याया देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रुपात मिळाली. देवेंद्रजी आणि आम्ही दुसरी इंनिग सुरू केली आहे. यापुढेदेखील असेच काम करत राहू. हाच आमचा अजेंडा आहे.”

मुंबईतील मराठा आंदोलनाची टाइमलाईन आणि मुख्यमंत्र्यांची सरशी?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट, शुक्रवारी मुंबईच्या आझाद मैदानात हजारो आंदोलकांसह धडकले होते. मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी केवळ पाच हजार आंदोलकांनाच एका दिवसाची परवानगी दिली होती. मात्र त्यापेक्षा अधिक आंदोलक मुंबईत आले. पहिल्या दिवशी दक्षिण मुंबईतील हॉटेल्स, टपऱ्या बंद असल्यामुळे आंदोलकांची गैरसोय झाली. यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले.

२०२४ मध्ये मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने आले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना नवी मुंबईतच रोखले आणि त्यांच्याबरोबरची शिष्टाई यशस्वी करून दाखवली. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनापासून दूर राहिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही आंदोलनापासून दूर राहिलेले पाहायला मिळाले.

३० ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी शनिवार आणि रविवार असल्यामुळे आंदोलनाची झळ दक्षिण मुंबईला तेवढी बसली नाही. मात्र १ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईत मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. उच्च न्यायालयानेही यावर नाराजी व्यक्त केली.

मंगळवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान परिसर आंदोलकांनी मोकळा करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. आंदोलन चिघळेल अशी परिस्थिती असतानाच मंगळवारी वेगाने घडामोडी घडल्या. शिंदे समितीच्या शिफारशी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने तात्काळ ३ शासन निर्णय काढले आणि आंदोलकांना दिलासा दिला.