शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा राग नाही. उद्धव यांच्याऐवजी संजय राऊत यांनी राजीनामा द्यायला हवा होता, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Uddhav Resign BJP Celebration: चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांना भरवला पेढा; घोषणाबाजी करत भाजपाचं हॉटेलमध्ये सेलिब्रेशन

“राजीनामा खरं म्हणजे संजय राऊत यांनी दिला पाहिजे. ते आमच्या मतावर राज्यसभेवर गेले आहेत. लोक आज त्यांच्यावर संतप्त आहेत. राष्ट्रवादी पक्षाने शिवसेना पक्ष तीन वेळा तोडला. चौथ्यांदाही राष्ट्रवादीने तोडला. त्यासाठी राऊत यांनी मदत केली. लोक मुख्यमंत्र्यांवर नाराज नाहीत. आम्ही राऊत आणि दोन पक्षांवर नाराज आहोत,” असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> “…आता फॅसिझमनं भयानक रुप घेतलं”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

तसेच “राऊत यांनी आमच्यावर टीका केली. ते आम्हाला डुक्कर म्हटले. कोणाच्याही आई-वडिलांना काही बोललेलं चालेल का? ते किती खालच्या पातळीवर जातात. त्यांची भाषा किती खराब आहे,” असेदेखील केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री म्हणून शेवटच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मानले मुस्लिमांचे आभार; CAA, NRC आंदोलनाचा उल्लेख करुन म्हणाले

“आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेलेलो नव्हतो. आम्ही त्यांना म्हणालो होतो की महाविकास आघाडी सोडा, आम्ही परत येऊ. पण काल रात्री ही मुदत संपली. मी मुदत देणार कोणी नाही. मी साधा कार्यकर्ता आहे. पण ५० लोकांचे जे मत होते ते मी त्यांना सांगितले होते,” असेदेखील केसरकर म्हणाले.

“आमच्या दृष्टीने ही दु:खाची बाब आहे. मी म्हणालो होतो की लवकर निर्णय घ्या. पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी तेच घडलं. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे ताणलं गेलं. राऊतांकडून ज्या प्रकारची वक्तव्ये केली गेली, त्यावरून सगळेच नाराज होते. कुणीच राऊतांशी बोलायला तयार नव्हतं. आमच्यातली दरी गेल्या काही दिवसांपासून वाढत गेली. आमच्या मुद्द्यांवर विचार झाला नाही. आमच्या मतदारसंघातून आम्ही पराभूत होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली,” असेही केसरकर म्हणाले.

“आम्ही त्यांच्या विरोधात नाही. आम्हाला यातून आनंद होत नाही. हळूहळू आम्ही लांब जात गेलो. आम्ही शिवसैनिक लांबचे झालो आणि राष्ट्रवादीचे नेते जवळचे झाले. मुख्यमंत्रीपदावर इतकी कामं असतात. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून आमचा संपर्क कमी होत गेला. त्यातूनच ही परिस्थिती उद्भवली आहे. याला उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत,” असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“झालं ते होऊन गेलं आहे. नव्याने सरकार स्थापन करायचं आहे. एकनाथ शिंदे सगळ्यांशी चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेतील आणि त्यानंतर इतर पक्षांशी ते चर्चा करतील,” असेही केसरकर म्हणाले.