रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसे विरोधक पराभवाच्या भितीने सरकारवर नवनवीन आरोप करीत आहेत. ‘इज्जत गेली गावाची आणि आठवण आली भावाची’ अशी म्हण सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जहरी टीका केली. रत्नागिरी येथील वि. दा. सावरकर नाट्यगृहात शिवसेनेच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार दिपक केसरकर, रवींद्र फाटक, माजी आमदार राजन साळवी, आमदार कीरण सामंत, आमदार नीलेश राणे, राजन महाडिक, आहिरराव, रचना महाडिक, सुभाष बने, संजय कदम, राहूल पंडीत यांच्यासह इतर पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, व्यासपीठ भरलेले असले तरी कार्यकर्त्यांचा यात मोठा सहभाग आहे. शिवसेना व कार्यकर्ते हे शिवसेनेचे एश्वर्य आहे. कोकणावर बाळासाहेबांनी प्रेम केले तेवढच कोकण वासियांनी देखील शिवसेनेवर प्रेम केले. कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे,असे शिंदे म्हणाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर १९९७ पासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने पुढील ५६ वर्ष हा भगवा कायम फडकत राहिल. मागील निवडणुकीत आणि आता येणा-या निवडणुकीत धनुष्यबाण आपल्याकडे आहे. त्यामूळे खरी शिवसेना आपली आहे. हा धनुष्य बाण वेगाने पळत आहे. त्यामुळे विरोधाकांची पळता भुई थोडी झाली आहे. या निवडणुकांमध्ये सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरल्यास विरोधकांचे डीपॉझीट जप्त झाल्या शिवाय राहणार नाही. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या ९ जागांपेकी ८ जागा आपण जिंकलो आहोत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, आपण शिवसेना कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. मुख्यमंत्री असताना आपण अनेक योजना आणल्या. युती सरकारने या योजना घराघरात पोहचविल्या आहेत. शासनाच्या योजनाचा पाच कोटी लोकांना याचा फायदा झाला आहे. येणा-या निवडणुकीत मतदार काम करणा-या लोकांना मते देतील, घरी बसणा-या लोकांना मते देणार नाहीत. फेसबुकवर लाईव्ह असणारी लोकं चालत नाही, तर थेट काम करणारी लोकं मतदारांना आवडतात. शिवसेनेचा मावळा कधीच रडिचा डाव खेळत नाही. तो रडत बसत नाही. मात्र हा मावळा रडणारा नसून लढणारा आहे. कार्यकर्त्यांनी चुकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या ताकदी वर ही निवडणूक आपल्याला जिंकायचे आहे. येणारी निवडणूक जरी आपल्याला सोपी असली तरी आपल्या विरोधकाला कमी समजू नये. कारण विरोधक हा स्वार्थी , कपटी आहे. आपल्याला सावध राहण्याची गरज असल्याचे ही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरीत मी पक्षाचा प्रमुख नव्हे तर तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. मात्र तुम्ही शिवसेनेची ताकद आहात. कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे. बाळासाहेबांचे विचार कोकणातील घराघरात पोहोचले आहेत. कोकणी जनतेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची संपत्ती खोलवर रूजली आहे. आजपर्यंत शिवसेनेने कायम जनतेच्या दुःखात जाऊन त्यांना मदत करण्याचे काम केले आहे. अतिवृष्टी, पूर, आतंकवादी हल्ले आणि आता मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात मदतीचा हात देणारी पहिली शिवसेनाच होती. आम्ही फक्त दौरे करत नाही तर मदतही करतो, असे ही शिंदे म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चौफेर जोमाने मुसंडी घेत आहे. महायुती म्हणून कोकणातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्याचा निर्धार करून कोकणचा कायापालट करूया, अशी हाक शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मारली.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपण येणा-या निवडणुकां साठी सज्ज आहोत असे सांगून युती होवो अगर न होवो मात्र जिल्ह्यात सर्वत्र भगवाच फडकरणार असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. याबरोबर राज्यमंत्री योगेश कदम , आमदार नीलेश राणे व आमदार दिपक केसरकर यांनी भाषणे केली.