सातारा : महाविकास आघाडीच्या पक्षांसह सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करणे म्हणजे निवडणुकीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास त्यांनी गमावल्याचे दिसत आहे. महायुतीच यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जिंकणार, असे वातावरण असल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. त्यांच्या पायाखालील वाळू सरकलेली आहे, अशी टीका शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

साताऱ्यात पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. महाविकास आघाडीचे नेते सध्या बेछूट विधाने करीत आहेत. सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाची भेट घेणे आणि त्यांनी मतदार यादी अद्ययावत नसण्याबाबत तक्रारी करणे, निवडणूक पुढे ढकलण्याची भाषा करणे म्हणजे त्यांना स्पष्ट पराभव दिसत आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याची ताकद आणि मानसिकता त्यांच्यात नाही. भीतीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. परिणामी त्यांनी अशा पद्धतीची मागणी केली आहे. शिंदे म्हणाले, ईव्हीएम मशीनची संस्कृती ही काँग्रेसच्या काळातील आहे. पूर्वी निवडणुका बॅलेट पेपरवरच होत होत्या.

निवडणूक आयोग हा राज्य सरकारसाठी काम करतो, असा आरोप राज ठाकरे यांनी केल्याचे निदर्शनास आणताच शिंदे म्हणाले, यांच्या जागा निवडून येतात किंवा सत्तेत जाण्याच्या ते प्रयत्नात असतात, त्यावेळी निवडणूक आयोग हा चांगला असतो. तेव्हा त्यांना कोणतीही तक्रार नसते. मात्र, महायुतीला यश मिळायला लागल्यावर त्यांच्या २३२ जागा विधानसभेत निवडून आल्यानंतर यांना राज्य निवडणूक आयोगाच्या कामांमध्ये त्रुटी दिसू लागतात, अशी टीका त्यांनी केली.

जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची हुकमशाही लोकांनी पाहिली. नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारणं, कंगना राणावतचे घर तोडणे, नारायण राणे यांना जेवताना अटक करणं, पत्रकारांना मारणं ही सगळी हुकूमशाही त्यांनी दाखवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांची वक्तव्य सर्वांनी पाहिली आहेत. ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी विचार करून बोलले पाहिजे किंवा त्यांनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

आम्ही अडीच तीन वर्षांमध्ये काम केलेले आहे. विकासाचे लोकाभिमुख काम सर्वसामान्यांसाठी केलेले आहे. आमच्या लाडक्या बहिणी विरोधकांना या ठिकाणी चारीमुंड्या चित करतील, असेही ते शेवटी म्हणाले.