राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-भाजपा सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि मुंबईतील मेट्रो-३ च्या कामासाठी लागणारा खर्च याबाबत राज्य सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही दुप्पट करण्यात आली आहे. तसेच मेट्रो-३ च्या कामासाठी १० हजार कोटी रुपये वाढवून देण्यात आले आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> मंत्रीपद मिळताच मंगलप्रभात लोढा ‘शिवतीर्थवर,’ राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट, कोणत्या विषयांवर चर्चा?

“शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून एनडीआरएफतर्फे मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या दुप्पट भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरची असलेली मर्यादा आता तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. नुकसान झाल्यानंतर नियमाप्रमाणे एनडीआरएफकडून जेवढी मदत दिली जात होती, त्याच्या दुप्पट मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून हेक्टरी ६८०० रुपये देण्यात येत होते. आता हीच रक्कम दुप्पट करण्यात आली आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >>> “हे धोका देणाऱ्यांचं राज्य” बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपाची प्रतिक्रया, शेलार म्हणाले “लोकशाहीत बोलण्याचा अधिकार पण…”

“आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो ३ च्या कामासाठी वाढलेला खर्च आहे, त्या किमतीला मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा प्रस्ताव मांडला होता. २०१५ साली या प्रकल्पाची २३ हजार कोटी रुपये किंमत होती. मात्र मागील अडीच वर्षाच्या काळात हे काम बंद असल्यासारखेच होते. हा प्रकल्प २०२२ सालापर्यंत पूर्ण करायचा होता. मात्र कार शेडच्या स्थगितीमुळे या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपयांची आणखी वाढ झाली आहे. २३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आता ३३ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >> “ज्यांच्या पक्षाचा जन्मच..,” भाजपा इतर पक्षांना संपवतो या शरद पवारांच्या आरोपावर आशिष शेलारांचा पलटवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“८५ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. केवळ कार डेपोचे काम २९ टक्केच झाले आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हा मेट्रो प्रकल्प जेव्हा सुरू होईल तेव्हा प्रतिदिवस १३ लाख लोक प्रवास करतील. ६ लाख वाहनांच्या ट्रिप रस्त्यावरून कमी होतील. २०३१ पर्यंत १७ लाख लोक या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रवास करतील,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.