शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत आपल्या भाषणामधून युवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आधी लक्ष्य केल्यानंतर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना थेट लग्न करुन पाहण्याचा सल्ला जाहीर सभेत दिला.

नक्की वाचा >> “मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो…” म्हणत रामदास कदमांचा हल्लाबोल; म्हटले, “बाळासाहेबांच्या आत्म्याला…”

सभेतील कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना रामदास कदम यांनी, “तुम्हाला सांगतो ही सभा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन तू पुढं चालं माझे आशिर्वाद तुला आहेत. हे बाळासाहेब वरुन सांगत असतील,” असं म्हटलं.

उद्धव यांच्यावर टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. “आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुणटुण टुणटुण खोका, खोका करत उड्या मारत आहेत. आता हा म्हणतंय बोका आणि नाव घेतंय खोका,” असा टोला कदम यांनी लगावला. पुढे कदम यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तरी आदित्य ठाकरेंना लग्नाचा सल्ला द्यायला हवा अशा शाब्दिक चिमटा काढला.

नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख

रामदास कदम यांनी अगदी चेहऱ्यावरुन हात फिरवत आदित्य यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना लग्नाचा सल्ला दिला. “आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ. मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते. म्हणजे खोके काय असतील ते कळेल,” असं रामदास कदम म्हणाले. तसेच पुढे बोलताना रामदास कदम यांनी, “जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. संपवून टाकलं सगळं,” असंही मत व्यक्त केलं.