महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. याआझी छगन भुजबळ, नारायण राणे आणि शेवटी राज ठाकरे यांच्या बंडखोरीचे धक्के सहन केलेल्या शिवसेनेला अजून एका मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागतोय की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असून ते सूरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार देखील असून ते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र उभं केलं जात आहे. या पार्श्वभूमवीर आता सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवकरच वातावरण निवळेल!

नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना निसर्गाच्या नियमानुसार हा ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे, पण लवकरच वातावरण निवळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपकडून केंद्रीय सत्तेचा, तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून राजकारण सुरू आहे. त्याचाच हा एक अध्याय आहे. भाजपा केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करतंय हे लपलेलं नाही. सत्तेतून पैसा आणि त्यातून अधिक सत्ता हीच त्यांची रणनीती राहिली आहे. भाजपानं असत्याचा मार्ग घेतला आहे. यात सत्याचा विजय होईल. हे थोड्या वेळेचं आहे. ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे. पण महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. हे सगळं निवळेल आणि सगळं व्यवस्थित होईल”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार पडणार?

दरम्यान, एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या गटामुळे शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन राज्यातील सरकार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यासंदर्भात नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दिवसा बहुमताची स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी तो आकडा पार पाडणं हे अजून फार दूर आहे. महाविकास आघाडीला अजून कोणतीही अडचण आहे हे मी मानत नाही. आमच्या पक्षात काल जी बंडखोरी झाली, त्याचं आत्मपरीक्षण करून त्यासंदर्भात हायकमांडला माहिती दिली जाईल”, असं म्हणत नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या मतदानाविषयी देखील भूमिका मांडली.

“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क नाही, पण…”; एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंसोबत कोण आमदार आहेत?

  • संजय राठोड एकनाथ शिंदेंसोबत असल्याची माहिती आहे.
  • अपक्ष आमदार जयस्वाल (रामटेक)
  • तानाजी सावंत (उस्मानाबाद)
  • ज्ञानराज चौघुले (उस्मानाबाद)
  • यवतमाळचे पालकमंत्री भुमरे
  • शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
  • विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
  • बालाजी किणीकर (अंबरनाथ)
  • भरत गोगावले (महाड)
  • महेंद्र दळवी (अलिबाग)
  • महेंद्र थोरवे (कर्जत)
  • कृषिमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचेही फोन बंद आहेत.
  • सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील पूर्वीपासून भाजपाच्या संपर्कात होते. ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
  • खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचाही सहभाग असल्याची माहिती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील खदखद त्यांनी मांडली होती.
  • कोल्हापूरचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.
  • प्रताप सरनाईक यांच्याविषयी संभ्रम कायम आहे
  • ठाकरे सरकार कोसळलं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आलं तर करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे भाजपाला पाठिंबा देऊ शकतात.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde not reachable in gujrat la meridian hotel with mla nana patole congress pmw
First published on: 21-06-2022 at 12:16 IST