Eknath Shinde PC : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून मोठा पेच निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचे वृत्त होते. या पदावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचंही म्हटलं जातं होतं. मात्र, या सर्व चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी अखेर खुलासा केला आहे. मी नाराज नसून आम्ही रडणारे नसून लढणारे आहोत. तसंच, मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपाने घ्यावा, तोच निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल असं एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं. आज त्यांनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषेद घेऊन त्यांची मुख्यमंत्री पदाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

राज्यात मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरीही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली झाल्याने त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागितल्याची चर्चा होती. दरम्यानच्या काळात अनेक चर्चा समोर येऊ लागल्या. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार किंवा केंद्रात कॅबिनेट पद देणार किंवा श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार, अशा चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरणात संभ्रमता निर्माण झाली होती. निकाल लागल्याच्या चार दिवसांनंतरही मुख्यमंत्री ठरत नसल्याने सामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेंडू थेट भाजपाच्या वरिष्ठ पातळीच्या कोर्टात टाकला आहे. म्हणजेच, त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. असं असलं तरीही राज्यात उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं.

हेही वाचा >> Eknath Shinde PC Live : “मी मोदींना फोन करून सांगितलंय की…”, सरकार स्थापनेबाबत शिंदेंचं मोठं विधान

मोदींनी घेतलेला निर्णय मान्य असेल

एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात आमचं बहुमताचं सरकार आलं आहे. तुम्ही प्रसारमाध्यमं आम्हाला विचारताय की सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलंय? मला तुमच्यासह राज्यातील जनतेला सांगायचं आहे की घोडं कुठेही अडलेलं नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेलं नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख पुरेशी आहे. त्यामुळे मी स्वतः काल (२६ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. त्यांना सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला माझ्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे माझ्याबद्दल मनात कुठलाही किंतू आणू नका. मागील वेळेस तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षे राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यासाठी मी आभारी आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या दिल्लीत तिन्ही पक्षांची बैठक

ते म्हणाले, “सरकार स्थापन, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेकरता उद्या दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. तिन्ही पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतच सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल.”