ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगगड येथे अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२ जानेवारी) हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मलंगगडाला मुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लीम समाजांत गेल्या अनेक वर्षांपासून वाद चालू आहे. दोन्ही धर्माचे लोक या जागेवर दावा करतात. काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. शिवसेना आणि स्थानिक हिंदू संघटनांचं हे आंदोलन अजूनही चालू आहे. या आंदोलनाचा उल्लेख करत एकनाश शिंदे यांनी उपस्थितांना मलंगगड मुक्तीचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारने केलेल्या कारवाईचं उदाहरण दिलं.
मुख्यमंत्री म्हणाले, आपलं सरकार राज्यातल्या पुरातन मंदिरांचं संवर्धन करत आहे. राज्यातल्या तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचा विकास केला जाणार आहे. या मंदिरासाठी राज्य सरकारने १३८ कोटी रुपये दिले आहेत. पंढरपूरचाही विकास केला जाणार आहे. पंढरपूरच्या विकास करताना सरकारकडून पैसे कमी पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.
एकनाथ शिंदे म्हणाले, मलंगगडाच्या बाबतीत तुमच्या सर्वांच्या भावना मला माहिती आहेत. या मलंगगडावर येऊन शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन सुरू केलं. मग आपण जय मलंग, श्री मलंग म्हणू लागलो. त्याचाही आपल्याला आनंद आहे. मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, परंतु, तुमच्या सर्वांच्या मलंगगड मुक्तीच्या भावना आहेत, मला त्या भावनांची कल्पना आहे आणि त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही.
हे ही वाचा >> मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून आज चार मॅरेथॉन बैठका, मनोज जरांगे राहणार गैरहजर; नेमकं कारण काय?
प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कारवाईचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रतापगडावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं. ते अतिक्रमण हटवण्याचं धाडस कोणीही करत नव्हतं. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला धाडसाची शिकवण दिली आहे. त्यामुळे मी मागे हटणार नाही. आपल्या मनातल्या भावना मला माहिती आहेत. त्या पूर्ण केल्या जातील.
