गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. आमदारांनंतर शिवसेनेचे १२ खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना का आहे? याची काही कारणंदेखील आठवले यांनी सांगितली आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, “दोन तृतीयांशपेक्षा अधिक लोकं एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाकडून एकनाथ शिंदे यांना नक्की न्याय मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.”

हेही वाचा- “दीपक केसरकर अचानक कंठ फुटल्याप्रमाणे…” भास्कर जाधव यांचं बंडखोर आमदारांवर टीकास्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले की, “शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदार एकनाथ शिंदेंच्या गटात आहेत. तर ५५ पैकी ४० आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांनाच शिवसेनेचं पक्षचिन्ह मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय नक्कीच एकनाथ शिंदेंच्या बाजुने निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे” असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.