शिवसेनेच्या शिंदे गटाने कोल्हापुरात महाअधिवेशन भरवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१७ फेब्रुवारी) या अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं. तसेच या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सर्वांना अयोध्येला घेऊन जाईन अशी घोषणा केली. तसेच यावेळी भाषणादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवेसनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांवर केलेल्या ‘गद्दार’ या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, एखादा नेता तुमच्याकडे असला की तो चांगला. त्याने तुमची (उद्धव ठाकरे) साथ सोडली की तो गद्दार, तो कचरा, असं तुम्ही त्याला संबोधता. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस हा महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही.
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं कर्तृत्व आरशात पाहावं. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगायला तोंडात नाही तर मनगटात जोर असावा लागतो, मनगटात ताकद हवी. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी आतोनात मेहनत घेतली, रक्ताचं पाणी केलं त्या नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. ज्यांनी शिवसेना मोठी केली त्यांचा अपमान केला. माझ्यासमोर शिशिर शिंदे बसले आहेत. भारतात पाकिस्तानचा क्रिकेट सामना होऊ नये म्हणून त्यांनी मुंबईचं वानखेडे स्टेडियम खोदलं होतं. त्यानंतर ते तुरुंगात गेले. पक्षात असे खूप लोक आहेत. काही लोकांच्या हत्या झाल्या, बाळासाहेबांबरोबर काम करणारे नेते आज माझ्याबरोबर आहेत. शिवसेना अशीच मोठी झाली नाही. त्यासाठी अनेकांनी घरावर तुळशीपत्रं ठेवली, तेव्हा शिवसेना मोठी झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, लोकांनी मोठ्या कष्टाने शिवसेना उभी केली आणि तुम्ही आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आलात. त्या रेघोट्याही तुम्हाला मारता आल्या नाहीत. मला एक गोष्ट समजली नाही, कुठला पक्षप्रमुख असतो जे आपल्याच नेत्याचा पाणउतारा करतो. त्यांच्याविरोधात कारस्थान करतो? मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर सभेतून, व्यासपीठावरून खाली उतरायला लावलं होतं, हे कोणाचं कारस्थान? त्यांचं घर जाळायला माणसं पाठवली, हे कोणाचं कारस्थान? ज्यांना जोशींचं घर जाळायला पाठवलं ती माणसं आज आपल्याबरोबर आहेत.
रामदास कदमांचा मनोहरपंत करण्याची योजना?
मुख्यमंत्री म्हणाले, मी रामदास कदम यांना सांगितलं होतं, की तुम्ही षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमाला जाऊ नका, तिथे तुमचा मनोहरपंत करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांचा अपमान करण्याचं कारस्थान रचलं होतं. माझ्यासमोर गजानन कीर्तिकर बसले आहेत. त्यांना मातोश्रीवरून कितीतरी वेळा परत पाठवण्यात आलं होतं. मुळात याच लोकांनी शिवसेना मोठी केली आहे. हेच लोक बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते.
हे ही वाचा >> “बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा, कारण..”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
“कार्यकर्ता चांगलं भाषण करत असेल तर त्याचं भाषण थांबवलं जायचं”
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी काय मागितलं होतं? यांचा तुम्हाला काय त्रास होता? यांना तुम्ही शिवसेनेतून का घालवलं. या लोकांनी जावं असं बाळासाहेबांच्या मनात नव्हतं. दरबारी राजकारण करणारे, कानात भुंगा करणाऱ्या लोकांनी सांगितलं, त्यामुळे तुमच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. आपल्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास नव्हता. आपला कार्यकर्ता मोठा होत असेल तर त्या नेत्याला कार्यकर्त्याचा अभिमान पाहिजे. एखादा कार्यकर्ता चांगलं भाषण करायला लागला तर त्याचं भाषण थांबवलं जायचं. गुलाबराव पाटील यांना त्याचा चांगला अनुभव आहे. रामदास कदमांना त्याचा अनुभव आहे.