एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केली. सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांवर आरोप करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत बंडखोरांच्या निशाण्यावर होते. राऊतांवर टीका करताना बंडखोरांनी ठाकरे कुटुंबाविषयी आदर असल्याचा दावा केला. मात्र, आता थेट ठाकरे कुटुंबालाच लक्ष्य करण्यात येतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना ‘पक्षप्रमुख’ उद्धव ठाकरेंना जन्मदिनाच्या सदिच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला. आता राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.”

हेही वाचा : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये एक पोस्टरही आहे. या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसेच जनतेचा कौल म्हणत राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी मांडण्यात आली आहे. यातच एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे. यानुसार, या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.