लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सांगोला तालुक्यातील महूद येथे टायर गोदामात मध्यरात्रीनंतर अचानकपणे स्फोट होऊन त्यात एका तरूणाचा मृत्यू आणि दुसरा तरूण भाजून गंभीर झाल्याची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील पाचेगाव येथे घरात वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार उजेडात आला. मारेकरी कोण आणि हत्येमागचे कारण काय, याचा उलगडा लगेचच झाला नाही.

भीमराव गणपती कुंभार (वय ६५) आणि सुसाबाई भीमराव कुंभार (वय ५०) अशी मृत वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. भीमराव यांच्या मानेवर लोखंडी जाड खिळा ठोकून आणि वायरने बांधून गच्चीवर टाकण्यात आले. तर त्यांच्या पत्नी सुसाबाई यांना गळफास देऊन त्यांचा मृतदेह जिन्याच्या खुंटीला अडकवल्याचे आढळून आले.

आणखी वाचा-मुकेश अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण, मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख यांनी घेतलं ‘हे’ नाव

सध्या पाचेगावात म्हसोबाची यात्रा सुरू असतानाच सायंकाळी ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थ हादरून गेले आहेत. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी मृतांच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत भीमराव यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा बंगळुरूमध्ये सराफी दुकानात काम करीत तेथेच स्थायिक झाला आहे. तर दुसरा मुलगा समाधान हा पाचेगावाच वडिलांच्या घरापासून थोड्या अंतरावर विभक्त राहतो.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या पध्दतीचे निरीक्षण केले.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेचे आयोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभार दाम्पत्याच्या घराशेजारी राहणारे डॉ. संजय बाबर हे त्यांच्या घराच्या गच्चीवर गेले असता त्यांना शेजारी राहणारे भीमराव कुंभार हे त्यांच्या गच्चीवर मृतावस्थेत आढळून आले. नंतर त्यांनी गच्चीवरून खाली उतरून त्यांच्या खिडकीतून डोकावले असता सुसाबाई कुंभार जिन्यावर खुंटीला अडकवलेल्या अवस्थेत दिसून आल्या.