वसईतील वीज समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात वसई-विरारकरांनी मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजेरी लावत उदंड प्रतिसाद दिला.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, संचालक विश्वास पाठक या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात नागरिकांनी वीज समस्या आणि मुद्दे हिरिरीने मांडले. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधितांनी उत्तरे दिली.
नालासोपारा तुळिंज येथे शुक्रवारी विजेशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात अनियमित वीजपुरवठय़ाच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या विरार, वसई आणि नालासोपारा भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. समस्येची धग मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकांनी मुद्दे मांडले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी मदत केंद्रांची व्यवस्था केलेली होती. त्या ठिकाणीदेखील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात तक्रारी नोंदविल्या.
शुक्रवारी नालासोपारा पाऊस कोसळल्याने रेल्वे स्थानक परिसर पाण्याखाली गेला होता. त्याचप्रमाणे पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली होती. तसेच वीज प्रवाह खंडित झाला होता. अशा स्थितीतही नागरिकांनी कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती.
जागोजागी उघडी असलेली रोहित्रे, वीज वितरण व्यवस्थेत असलेला दोष, सातत्याने येत असलेली वाढीव वीज बिले, नादुरुस्त होणारी वीज मीटर, धोकादायक लोंबकळत असलेल्या वीज तारा या समस्या मंत्र्यांच्या कानावर घातल्या. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन शासनाकडून करण्यात येत असलेल्या सकारात्मक उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.
‘लोकसत्ता’च्या माध्यमातून वीज परिषदेचे आयोजन केल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून महावितरण विभागाचे अधिकारी कोणत्याही प्रकारचा तांत्रिक विद्युतसंदर्भातील दोष निर्माण होऊ नये यासाठी व निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना केली जात आहे. कायम अशीच कार्यपद्धती ठेवल्यास वसई-विरारमधील नागरिकांना त्रास होणार नाही. ‘लोकसत्ता’ने या ज्वलंत विषयावर आवाज उठवत असल्याने जनतेला दिलासा मिळत आहे.
आशीष कदम, नागरिक विरार
नागरिकांच्या प्रतिक्रिया
खूपच छान झाला कार्यक्रम. आमच्या समस्या ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचल्या, आता नक्कीच महावितरणमध्ये सुधारणा होतील. ‘लोकसत्ता’चे आभार.
-नितीन डिमेलो
वीजपुरवठा खंडित होणे ही वसई तालुक्यातील सर्वात मोठी समस्या आहे आणि आज ‘लोकसत्ता’मुळे ते ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि कार्यक्रम उत्तम झाला आहे.
– आकाश ठाकूर
महावितरण अधिकारी व अभियंत्यांकडे आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ नसतो. आज कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविता आल्या. कार्यक्रम खूप छान झालेला आहे.
-रंजना उपाध्य