लोकसत्ता वार्ताहर
राहाता : साईबाबांचे बोलावणे या वेळी थोडे उशिरा आले. पण, जेव्हा जेव्हा शिर्डीला येते तेव्हा घरी आल्यासारखं वाटतं. साईंचा हात कायम माझ्या डोक्यावर आहे. श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा संदेश प्रत्येकाने पाळावा. त्यामुळे सगळे चांगले होत असल्याचे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
शिल्पा शेट्टी हिने सहकुटुंब शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी तिच्यासमवेत पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीक्षा, आई सुनंदा शेट्टी व राज कुंद्रा यांची बहीण रिना उपस्थित होते.
दर्शनानंतर शिल्पा शेट्टी म्हणाली, ‘प्रत्येक वेळेस इथे आले, की एक वेगळीच शांतता मिळते. साईबाबांचे दर्शन म्हणजे आमच्यासाठी एक आत्मिक अनुभव असतो. साई मंदिरात येताना खास करून आपला आवडता गुलाबी अर्थात राणी रंगाचा ड्रेस घालून येते. राणी पिंक माझा आवडता रंग असल्याने मी जेव्हा खूप प्रवास करून थकून आल्यावर, थकवा दूर झाला. बाबांनी शक्ती दिली. पैशांच्या व्यतिरिक्त बाबांनी भरपूर काही दिले. जीवनात सुख महत्त्वाचे असते. जीवनात जितके चढउतार बघितले. परंतु जे होते ते चांगल्यासाठीच!’
मंदिरात प्रवेश करतानाच भाविक आणि चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. शिल्पाने समाधीवर चादर अर्पण करत साईबाबांची प्रार्थना केली. शिर्डीच्या रस्त्यांवर शिल्पाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी तिच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेण्याची संधी साधली. शिल्पाने नेहमीप्रमाणे सौम्य हास्याने सर्वांना अभिवादन केले. तिने सहपरिवार शनिशिंगणापूर येथे जाऊन शनी मूर्तीला तेलाचा अभिषेक केला. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी तिचा सत्कार केला.