Khedkar Family Manhunt by Police: पुणे आणि नवी मुंबई पोलीस बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईतून एका ट्रक चालकाचे अपहरण केल्यानंतर खेडकर कुटुंबियांच्या पुण्यातील घरी सदर चालक आढळून आला होता. सोमवारपासून पोलीस दिलीप खेडकर यांचा शोध घेत असून त्यांचा फोन बंद आहे. तसेच खेडकर कुटुंबातील एकाही सदस्याने तीन दिवसांत एकही ऑनलाईन व्यवहार केलेला नाही, अशी माहिती आता समोर येत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, आम्ही खेडकर कुटुंबियांचा शोध घेत आहोत. पण त्यांनी त्यांचे फोन बंद ठेवले आहेत. तसेच ते संपर्कात नाहीत. आता आम्ही त्यांच्या निवासस्थानाच्या आसपास असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहोत, जेणेकरून ते ज्या वाहनातून पळाले, त्याची माहिती मिळू शकेल.

नेमके प्रकरण काय आहे?

नवी मुंबईच्या रबाळे येथून सिमेंट मिक्सर वाहन चालक तरुणाचे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. यानंतर एकच खळबळ उडाली. मिक्सर वाहन चालक प्रल्हाद कुमार (२२ वर्षं) व त्याच्या सहकाऱ्याशी अपघातानंतर नुकसानभरपाईच्या वादावरून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री मिक्सर वाहन चालक तरुण आणि दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझर गाडीचा किरकोळ अपघात झाला. अपघातात गाडी घासली घेल्याने खेडकर यांनी नुकसानभरपाईची मागणी केली असता, चालकाने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा संताप आल्यानंतर खेडकर यांनी संबंधित चालकाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगत जबरदस्ती गाडीत बसवले. मात्र, पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी त्यांनी चालकाला पुण्यातील स्वतःच्या घरात डांबून ठेवले.

पोलीस तपासात काय निष्पन्न झाले?

ट्रक चालक हरवल्यानंतर त्याच्या सहकाऱ्याने रबाळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून गाडीचा मागोवा घेतला असता पूजा खेडकर यांच्या पुण्याच्या चतुःशृंगी हद्दीतील निवासस्थानी धडक दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता तरुणाला गाडीत डांबून पुण्यात नेणारे वाहन चालक आणि त्यांचे सहकारी हे अन्य कोणीही नसून हे पूजा खेडकर यांचेच वडील दिलीप खेडकर आणि त्यांचे अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालक तरुणाची सुखरूप सुटका केली.

खेडकर कुटुंबियांचा अंतरिम जामिनासाठी प्रयत्न

पोलीस अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबिय कदाचित अंतरिम जामीनासाठी याचिका दाखल करू शकतात. त्यांना संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ते लपून राहण्याच्या प्रयत्नात आहेत. नवी मुंबई आणि पुणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत.

सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चर्चा गेल्या काही काळात जोरदार झाली. ओळख लपवून यूपीएससीची परीक्षा अनेकदा देण्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच आयएएस होण्यासाठी त्यांनी अपंगत्वाचे आणि ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्रही मिळवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण मागे पडत असताना आता त्यांच्या वडिलांनी एका ट्रक चालकाचे अपहरण केल्यानंतर खेडकर कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.