नांदेड: मागील काही वर्षांत आपल्या समूहातील दोन प्रकल्पांची विक्री करून कर्जाचा भार कमी करणार्‍या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने आता येळेगाव आणि डोंगरकडा येथील दोन्ही प्रकल्पांच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्याचे ठरवले आहे. कारखान्याला मागील हंगामात नाममात्र नफा झाला, तरी एकूण संचित तोटा ५० कोटींच्या घरात गेला आहे.वरील कारखान्याची ३२वी वार्षिक सभा गेल्या महिनाअखेर घेण्यात आली. त्यानंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर दोन्ही प्रकल्पांत बॉयलर पेटविण्याचा कार्यक्रम प्रचलित प्रथेनुसार झाला. या कारखान्याची वार्षिक सभा होण्याच्या दोन दिवस आधी ‘मांजरा’ कारखान्याने यंदाच्या हंगामात उसासाठी किमान ३१५० रू. प्रतिटन भाव देण्याचे जाहीर केले होते; पण ‘भाऊराव चव्हाण’ने किमान दराची घोषणा न करताच, यंदाच्या हंगामाची तयारी सज्जता केली आहे.

जिल्ह्यातील एका आमदाराने ऊस दराच्या मुद्यावरून ‘भाऊराव चव्हाण’च्या कर्त्याधर्त्यांना डिवचल्यानंतर साखर कारखानदारीतील ‘रसा’शीही ज्यांचा संबंध नाही, अशा काही अशोक चव्हाण समर्थकांनी वरील आमदारावर कडवट प्रतिक्रिया नोंदविल्या. कलंबर कारखान्याची वाट लावणार्‍या या आमदाराने केवळ वरवरच्या माहितीवरच निशाणा साधला होता, त्यास उत्तर देण्यात आले, तरी कोणीही या कारखान्याच्या एकंदर स्थितीची माहिती दिली नव्हती, ती आता समोर आली आहे.कारखान्याच्या यंदाच्या वार्षिक सभेसमोर ३२वा वार्षिक अहवाल ठेवण्यात आला. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात कारखान्याला ७० लाख ५ हजार रूपयांचा नफा झाला; पण आधीच्या वर्षात असलेल्या ४७ कोटी २२ लाख ३४ हजारांच्या तोट्यामध्ये नाममात्र घट झाली. आता या कारखान्यावरील तोटा ४६ कोटी ५२ लाख २८ हजार इतका आहे. वर्ष २०२३ अखेर कारखान्याचा तोटा ४९ कोटींवर गेला होता. त्या एकाच वर्षात तब्बल १७ कोटींचा तोटा नोंदला गेला.

कारखान्याच्या दोन्ही प्रकल्पांमध्ये साखर उत्पादनासोबतच येळेगाव येथे इथेनॉल प्रकल्प चालविण्यात येतो. साडेशेहेचाळीस कोटींचा तोटा आणि इतर देणी प्रचंड प्रमाणावर असतानाही दोन्ही प्रकल्पांची क्षमता ५ हजार मे. टन गाळपापर्यंत नेण्याची मोठी योजना कारखान्याने आखली आहे. इथेनॉल प्रकल्पाचे मका व खराब अन्नधान्य वापरून डिस्टीलरीजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावालाही वार्षिक सभेची मान्यता घेण्यात आली. वेगवेगळ्या योजनांसाठी निधी उभारण्याकरिता व्यक्ती, संस्था आणि कंपन्यांकडून ठेवी किंवा कर्जे घेण्यास सभासदांची मंजुरी घेण्यात आली; पण या सर्व बाबींचा तपशील अहवालामध्ये देण्यात आलेला नाही.

गेल्या एप्रिल महिन्यात कारखान्याच्या नेतृत्वात बदल करण्यात आला. अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेल्या गणपतराव श्यामराव तिडके यांच्या हाती नारळ देत त्यांच्या जागी नरेन्द्र भगवानराव चव्हाण यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच वार्षिक सभा शांततेत आणि सुरळीत पार पडली, तरी  कारखान्याच्या ताळेबंदात मात्र सुरळीतपणा दिसून आला नाही. त्यावर चर्चा घडवून आणण्याच्या भानगडीत कोणीही पडले नाही. अशा पार्श्वभूमीवर हा कारखाना आगामी हंगामासाठी सज्ज झाला आहे.

साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी क्षमतेइतके ऊस गाळप होणे आवश्यक आहे. तथापि मागील दोन गळीत हंगामांमध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील बराच ऊस अन्य साखर कारखान्यांकडे गेल्यामुळे आमच्या कारखान्यात उद्दिष्टाप्रमाणे गाळप होऊ शकले नाही. त्यामुळे कारखान्यास आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. – नरेन्द्र चव्हाण,अध्यक्ष, भा.च.स.सा.कारखाना