सातारा : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सर्व ‘डिजिटल’ पुराव्याची ‘सायबर टीम’मार्फत तपासणी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मृत डॉक्टरच्या मोबाईलमधील सर्व तपशील ताब्यात घेतले आहेत. यातील कोणतेही तपशील नष्ट केलेले नाहीत. याबरोबरच संबंधित डॉक्टरचे वैयक्तिकरित्या लेखी स्वरुपातील कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचेही दोशी यांनी या वेळी सांगितले.
फलटण येथील आत्महत्या प्रकरणात महिला डॉक्टरांच्या ‘व्हाट्सअप’वरील तपशील नष्ट केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, असा कुठलाही तपशील नष्ट केलेला नाही. मिळालेल्या सर्व ‘डिजिटल’ पुराव्यांची ‘सायबर टीम’मार्फत तपासणी सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व प्रकरणाचा सर्व माध्यमातून योग्य तपास सुरू आहे. पोलीस तपासावर कोणताही दबाव नाही. या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सर्व बाजूंनी पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे, असेही दोशी यांनी सांगितले.
मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने तळहातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले आहे. तळहातावरील हस्ताक्षर तपासण्यासाठी आणि त्यांच्या इतर नोंदी त्यातील हस्ताक्षर याची तांत्रिकदृष्ट्या तपासणी तज्ज्ञांकडून केली जाणार आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा पोलीस आणि सायबर विभागाच्या यंत्रणा एकत्रित तपास करत आहेत. महिला आयोगही या तपासकामावर लक्ष ठेवून आहे.
