मार्केटिंगसाठी श्रमिकमुक्ती दलाचा पुढाकार
आपल्या रुचकर चवीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिताडा माशाचे ब्रॅण्डिंग होणार आहे. श्रमिकमुक्ती दलाने यासाठी पुढाकार घेतला असून रायगड जिल्ह्य़ातील खारेपाट विभागात शेततळ्यामध्ये होणारा हा जिताडा मासा आता मुंबई आणि नवी मुंबईत विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
अलिबाग तालुक्यातील खाडीपट्टय़ात आढळणारा जिताडा मासा हा आपल्या रुचकर चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे खारेपाट विभागातील शेतकरी शेततळ्यामध्ये या माशाचे उत्पादन घेत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला जिताडय़ाची पिल्ले आणून शेततळ्यात सोडली जातात. पावसाळ्यानंतर तयार झालेले मासे जवळपासच्या बाजारामध्ये विकले जातात. या माशाला स्थानिक बाजारात मोठी मागणी असते. किलोमागे पाचशे ते सातशे रुपयांचा दर मत्स्यउत्पादक शेतकऱ्यांना मिळत असतो. मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील पर्यटक अलिबागला आल्यावर या माशावर हमखास ताव मारत असतात. पण योग्य मार्केटिंगअभावी हा मासा अलिबाग, पेण तालुक्यापुरताच सीमित राहतो.
ही बाब लक्षात घेऊन श्रमिकमुक्ती दलाने जिताडय़ाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागामध्ये विशेषत: पनवेल व नवी मुंबई या भागात जिताडय़ाला मागणी आहे. यामध्ये मत्स्य उत्पादन करणारा शेतकरी व शहरातील ग्राहक यांची जोडणी होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरी वसाहतीमधील महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर आत्तापर्यंत नऊ बचत गटांनी या जिताडय़ाच्या विक्रीसाठी अनुकूलता दर्शवली आहे. तर डोंबिवलीतील एका उद्योजकाने जिताडा निर्यात करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.
या अनुषंगाने श्रमिकमुक्ती दलाने खारेपाट विभागातील जिताडा उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. या संकलित माहितीच्या आधारे शेतकरी बचत गटांची स्थापना केली जाणार आहे.
शेतकरी आणि महिला बचत गटांच्या शृंखलेतून जिताडा खरेदी-विक्रीची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना जिताडा संवर्धन आणि विक्री उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी राजन भगत (७५८८१०५१४८) किंवा प्रा. सुनील नाईक (९८२०९४६१७४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रमिकमुक्ती दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘मत्स्य तलावधारक, मत्स्यउत्पादक, मत्स्यविक्रेते आणि ग्राहक अशी सुयोग्य बांधणी केली जाणार आहे. जिताडा माशाचे ब्रॅडिंग करून त्याचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीस चालना मिळेल आणि मत्स्यउत्पादन वाढेल.’
– राजन भगत, समन्वयक श्रमिकमुक्ती दल