चारुशीला कुलकर्णी
शेतकरी पतीच्या अकस्मात निधनानंतर डोक्यावर पडलेलं २५ लाख रुपयांचं कर्ज, शेतीकामाचं अजिबात ज्ञान नाही आणि संपूर्ण कुटुंबाची आलेली जबाबदारी, अशा वेळी त्यांना शेती करण्यावाचून पर्यायच नव्हता. कधी शिकत, तर कधी चुकत वेगवेगळे प्रयोग त्यांनी सुरू केले आणि प्रारंभी दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न घेणाऱ्या त्यांच्या द्राक्षबागेतील उलाढाल आज नऊ वर्षांत २५ लाख रुपयांपुढे पोहोचली आहे. एकूण उत्पादनापैकी
७० टक्के निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, संगीता बोरस्ते.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील साकोरे (मिग) येथील बोरस्ते कुटुंबातील अरुण यांच्याशी संगीता विवाहबद्ध झाल्या तेव्हा त्यांचे वय होते अवघे १६ वर्षांचे. अरुण हे शेतीबरोबरच एका बँकेत नोकरी करत होते. या दाम्पत्यास तीन मुली आणि एक मुलगा. कौटुंबिक जबाबदाऱ्या, वाढता खर्च यामुळे बँकेची नोकरी सोडून अरुण यांनी पूर्णवेळ शेतीकडेच लक्ष देण्याचे ठरवले. वाटणीला आलेल्या आठ एकर शेतीत ते राबू लागले. शेतीचा अनुभव नव्हताच. परिसरातील शेतकरी, मित्र यांच्या सल्ल्याने त्यांनी द्राक्ष पीक घेण्यास सुरुवात केली. शेतात विहीर खोदली. त्यासाठी कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते फेडत असताना पहिल्या वर्षी दोन लाख रुपयांचे उत्पन्न आले. संगीता त्या वेळी पूर्णवेळ गृहिणीपद स्वीकारून कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र होत्या. सारे काही सुरळीत असताना २०१४ मध्ये अरुण यांचे आकस्मिक निधन झाले आणि घराची, कुटुंबीयांची, शेतीची संपूर्ण जबाबदारी संगीता यांच्या अननुभवी खांद्यांवर पडली.
डोक्यावरचे २५ लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचे त्यांच्यापुढे आव्हान होतेच, पण मुळात शेती कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न होता. शेतीशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. साहजिकच त्यांनी द्राक्ष शेतीतील बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली. पुतण्या सचिन आणि परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी मदतीचा हात दिला, पण कसोटीचे क्षण स्वत:च पार पाडायचे होते. शेती करताना निसर्गाच्या लहरीपणाबरोबरीने त्रास झाला तो बाजारात वेळोवेळी बदलत जाणाऱ्या द्राक्षभावाचा, मजुरांनी दिलेल्या त्रासाचा, काही लोकांकडून लहानमोठय़ा गोष्टीसाठी होणाऱ्या अडवणुकीचाही.
अरुण यांच्या निधनानंतर विम्याचा १८ लाख रुपयांचा परतावा त्यांना मिळाला. ही रक्कम त्या मुलांचे शिक्षण आणि अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी वापरू शकल्या असत्या. मात्र त्यांनी संपूर्ण रक्कम शेतीच्या भांडवलासाठी गुंतवली. गरजेनुसार द्राक्षतज्ज्ञ आणि सल्लागारांची मदत घेत पहिल्या वर्षी ‘थॉमसन’, ‘तास-ई-गणेश’ या वाणाचे त्यांनी यशस्वी उत्पादन घेतले आणि मग मात्र त्यांना शेती उत्पादनातल्या कळीच्या गोष्टी समजल्या. अर्थात प्रचंड मेहनतीपासून सुटका नव्हतीच. बागेतील कात खरड, छाटणी, फवारणी, गोडी बहर छाटणी, काढणी ते विक्री अशी सर्व कामे करत त्या आता यशस्वी शेतकरी म्हणून ठामपणे उभ्या आहेत.
अर्थात संगीता यांचा हा प्रवास सोपा नाही. काही वेळा काढणीला आलेले पीक अध्र्या तासाच्या पावसात जमीनदोस्त झालेले त्यांनी अनुभवले आहे. बाहेर पावसाचे पाणी आणि घरात डोळय़ांतील पाणी थांबायचे नाव घेत नसायचे. निसर्गाच्या लहरीपणाने त्यांना एकेका वेळी पाच ते सात लाख रुपयांचा फटका बसला आहे. शेतीशिवाय दुसरे कुठलेच उत्पन्नाचे साधन नसल्याने शेती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे आर्थिक गणित जुळवताना अनेकदा नाकीनऊ आले. त्यात खरी परीक्षा घेतली करोना महासाथीच्या काळाने.
टाळेबंदीमुळे परदेशात जाणारा माल, स्थानिक पातळीवर विकला जाणारा माल शेतातच पडून राहिला. त्या वेळी स्थानिक मजूर, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने द्राक्षांचे घड उतरवत बेदाणे बनविणाऱ्या उत्पादकाला मिळेल त्या भावात विकणे भाग पडले. नंतरच्या काळात संगीता यांना करोनाने ग्रासले. त्या दवाखान्यात दाखल झालेल्या असताना जुजबी ओळखीतून एका व्यापाऱ्याशी द्राक्ष विक्रीचा व्यवहार ठरला. व्यापारी द्राक्ष घेऊन पैसे न देताच गायब झाला. त्यावर कडी म्हणजे मजूरही ठरलेली मजुरीची रक्कम आगाऊ घेऊन निघून गेले. अशा वेगवेगळय़ा अडचणींना तोंड देत देत संगीता आजच्या मुक्कामी पोहोचल्या आहेत. अशी आर्थिक झळ बसत असतानाच बऱ्याचदा अडचण आली ती कमी शिक्षणाची. खत फवारणी किंवा अन्य कागदपत्रांच्या बाबतीत इंग्रजी येत नसल्याने इतरांकडून ते समजून घ्यावे लागते आणि कामाच्या व्यापात आजवर शिकायला सवड मिळाली नाही, ही खंत आजही त्यांच्या मनात आहे. मुलींनी, सुनेने शिक्षण घ्यावे, स्वत:च्या पायावर उभे राहावे, हा सल्ला त्या देतात. ‘सह्याद्री फार्म’च्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरात आज त्या तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
अडचणी आल्या की त्यातून मार्ग काढत जाणे यशस्वी माणसाचे लक्षण असते. मजुरांकडून सातत्याने होणाऱ्या अडवणुकीवर कायमचा मार्ग म्हणून संगीता यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला जवळ केले आहे. फवारणी यंत्र, ट्रॅक्टर, जैविक पद्धतीचा अवलंब यासह नवनवीन प्रयोग करत दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांमुळे एकूण उत्पादनाच्या ७० टक्के निर्यात तर ३० टक्के देशांतर्गत विक्री त्या करू शकतात. तीन वर्षांत त्यांचे उत्पन्न २० लाखांहून अधिकपर्यंत पोहोचले आहे.
‘सह्याद्री फार्म कंपनी’च्या भागधारक असणाऱ्या संगीता यांच्या कामाची दखल घेत राज्य शासनाने त्यांना ‘वसंतराव नाईक पुरस्कार’, सरस्वती बँकेच्या वतीने प्रयोगशील शेतकरी, सुविचार मंचचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. भविष्यात द्राक्ष शेतीबरोबरच कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याचा त्यांचा विचार असून द्राक्ष पिकातील नवीन वाणाची लागवड करण्याचेही त्यांनी ठरवले आहे.
परिस्थिती कितीही बिकट असली तरी न डगमगता त्याला तोंड देत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या उद्यमशील शेतकरी संगीता यांना त्यांच्या भविष्यकालीन प्रयोगांसाठी खूप शुभेच्छा..
संगीता बोरस्ते
२५ लाख रुपयांचे कर्ज असताना पतीचे अकस्मात निधन झाले आणि शेती व कुटुंबाची जबाबदारी पूर्णत: त्यांच्या खांद्यावर पडली. शेतीकामाचा अजिबात अनुभव नसतानाही त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले, पण कधी तयार पीक डोळय़ांसमोर पावसात वाहून गेले, तर कधी पैसे न देताच तयार द्राक्ष पीक घेऊन व्यापारी पळून गेला.. अशा अनेक अडचणींवर मात करून गेल्या नऊ वर्षांत ७० टक्के निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करत उद्यमशील शेतकरी ठरलेल्या यंदाच्या दुर्गा आहेत, संगीता बोरस्ते.
मुख्य प्रायोजक : उषा काकडे ग्रुप
सहप्रायोजक : मे. बी. जी. चितळे डेअरी
टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
उज्ज्वला हावरे लेगसी
पॉवर्ड बाय : केसरी टुर्स
व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स
ओ एन जी सी
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.
संपर्क :
संगीता बोरस्ते – ७०६६३००७३५
पत्ता – साकोरे मिग, ता. निफाड, जि. नाशिक
