बीड – आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी येथे एका शेतकऱ्याचा मृतदेह सोमवारी सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत व काही अवयव गायब असलेल्या अवस्थेत आढळून आला. बिबट्याने हल्ला केल्यानेच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, वनविभागाकडून अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी घटनास्थळाचा पंचनामा सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने मात्र आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले.

राजू विश्वनाथ गोल्हार (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजू गोल्हार हे रविवार गुरे चारण्यासाठी गावानजीकच्या शेतशिवारात गेले होते. सायंकाळी गुरे परतली. पण शेतकरी राजू गोल्हार घरी काही परतले नाहीत. त्यांचा शोध कुटुंबियांकडून सुरू होता. अखेर त्यांचा मृतदेह शेतापासून दूर दोन किमी अंतरावर आढळला असून त्यांच्या शरीराचे हात-पाय असे काही अवयव आढळून आले नाहीत. शिवाय उर्वरीत मृतदेहावर अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या खाणा-खुणा असून, हा प्रकार बिबट्यानेच केलेल्या हल्ल्याचा असल्याचा अंदाज ग्रामस्थांमधून वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. पंचनामा सुरू होता. तर शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच राजू गोल्हार यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला की अन्य काही कारण आहे, हे स्पष्ट होईल, रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.