सावंतवाडी : गव्यांच्या कळपातील एका गव्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात आंबेगावातील शेतकरी दत्ताराम सखाराम कुंभार (६५) गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर गोव्यातील बांबोळी रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया सुरू आहे.

​दत्ताराम कुंभार हे नेहमीप्रमाणे शेतातले काम आटोपून घरी परत येत असताना, अचानक कळपातून आलेल्या एका गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरडाओरड ऐकून ग्रामस्थ धावून आले. या हल्ल्यात त्यांच्या बरगड्या तुटल्या असून जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.

​प्रथम त्यांना सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोव्यातील बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची माहिती वनखात्याला देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे कुणकेरी-आंबेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, त्यामुळे वनविभागाने तात्काळ या धोकादायक गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.