कराड : गंजीतून वैरण काढताना घोणस सर्पाच्या दंशाने शशिकला रमेश पाटील (वय ४५) या शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुढे (ता. पाटण) येथे घडली. पावसाळ्यात सर्वाधिक सर्प आढळतात. विशेषतः कृष्णा- कोयना नद्यांकाठी सर्पांचा सुळसुळाट झाला आहे. यात विषारी घोणस सर्पाचे प्रमाण मोठे असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
सर्पदंशाने मृत पावलेल्या शशिकला पाटील यांच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे. कराडच्या प्रीतिसंगम बागेत अलीकडेच घोणस सर्पाची पिल्ले सापडताना, यातील एका पिल्लाने ३१ वर्षीय महिलेच्या पायाला दंश केल्याने खळबळ उडाली होती. सुदैवाने ही महिला तातडीच्या उपचारांमुळे बचावली. या गंभीर प्रकारामुळे आठवड्याभरापासून ही बागही बंद ठेवण्यात आली. दरम्यान, बाग परिसरातील सर्प शोध मोहीम व उपाययोजना करण्यात आल्या. त्यात घोणस सर्पाची १४ पिल्ले आढळून आली आहेत.
घोणस मादी सर्पाला किमान २३ आणि त्याहून अधिक पिल्ले होत असल्याने प्रीतिसंगम बागेत आणखी पिल्ले आहेत का? हा प्रश्न कायम असताना, सर्व ती दक्षता घेवून कराड पालिकेने प्रीतिसंगम बाग लोकांसाठी खुली केली आहे. मात्र, अजूनही सर्प भय संपलेले नसून, प्रीतिसंगम बागेत येणाऱ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांना दक्षता घ्यावी लागणार आहे.